लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई: करोनाकाळात वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची उणीव प्रकर्षाने जाणवली होती. त्यामुळे वैद्यकीय विभागात मोठ्या प्रमाणात भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय विभागातील वर्ग ३ मधील कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया मे अखेर किंवा जूनमध्ये राबविण्यात येणार आहे.

राज्याच्या वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे अनेक योजना किंवा उपक्रम राबविण्यात अडचणी येत आहेत. करोनामध्ये कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे रुग्ण सेवेमध्ये अनेक संकटाना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे वैद्यकीय विभागामध्ये तातडीने कर्मचारी भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच राज्यातील सर्व वैद्यकीय, दंत वैद्यकीय, आयुर्वेद आणि होमिओपॅथी महाविद्यालयांच्या अधिष्ठातांसोबत बैठक घेतली.

हेही वाचा… मुंबई: अभियांत्रिकी प्रवेशासाठी ७५ टक्के गुणांचा पात्रता निकष कायम राहणार; उच्च न्यायालयाचा हस्तक्षेपास नकार

या बैठकीमध्ये वर्ग ३ मधील कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही भरती प्रक्रिया मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनमध्ये राबविण्यात येणार आहे. ही प्रक्रिया टीसीएस कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vacancies of class 3 staff in medical department will be filled soon in mumbai mumbai print news dvr