शैलजा तिवले
लसीकरणासाठी मुंबईतील सर्व केंद्रावर तयारी झाली असली तरी लाभार्थ्यांची यादी शुक्रवारी रात्रीपर्यत केंद्राना प्राप्त झाली नव्हती. तर कूपर, राजावाडी आणि बीकेसीच्या लसीकरण केंद्र वगळता अन्य केंद्रांना को-विन अॅपही उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे केंद्र शुक्रवारी रात्रीपर्यत अॅप आणि लाभार्थ्यांच्या यादीच्या प्रतीक्षेत होते.
शुक्रवार संध्याकाळपर्यंत लसीकरण करण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांची यादी केंद्राना मिळालेली नाही. आम्हाला लाभार्थ्यांच्या संख्या सांगितली आहे. परंतु लाभार्थी कोण असतील याची यादी संध्याकाळपर्यंत मिळण्याची अपेक्षा होती, असे लोकमान्य टिळक रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
लाभार्थ्यांची यादी तयार होत असून रात्रीपर्यत पाठविली जाईल असे पालिकेतून सांगण्यात आले आहे. त्याअर्थी लाभार्थ्यांनाही संध्याकाळपर्यत उद्या लसीकरणासाठी येण्याचे संदेशही पाठविले असण्याची शक्यता नाही. लसीकरणासाठी मानसिक तयारीसह त्यांच्या वैयक्तिक कामाचे नियोजन करण्यासाठी लाभार्थ्यांना पुरेसा वेळे देणे आवश्यक होते. यासाठी किमान शुक्रवारी दुपापर्यंत संदेश जाणे गरजेचे होते, असे मत लसीकरण केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
‘अॅप आणि यासंबंधी युजर आयडी, पासवर्ड इत्यादी माहिती शुक्रवारी रात्रीपर्यंत मिळाली नाही. अॅपचे प्रशिक्षण दिले असले तरी लसीकरणाची पूर्ण प्रक्रिया अॅपवर अवलंबून असल्याने प्रत्यक्ष वापराचा सराव एक दिवस आधी होणे गरजेचे होते, असे नायर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
यादी पाठविल्याचा पालिकेचा दावा
लाभार्थ्यांची यादी आणि लाभार्थ्यांना संदेश शुक्रवारी संध्याकाळी पाठविल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयमुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
पर्यायी व्यवस्था
लाभार्थ्यांची यादी शुक्रवारी रात्री उशिरापर्यत न मिळाल्याने बीकेसीच्या करोना आरोग्य केंद्राने रुग्णालयातील पाचशे कर्मचाऱ्यांची अॅपमध्ये नोंदणी करून संदेश पाठविले आहेत. मुख्यमंत्री उपस्थित असताना ऐनवेळी गोंधळ होऊ नये म्हणून रुग्णालयाने पर्यायी व्यवस्था केल्याचे समजते.