मुंबई: पालिकेकडील लशींचा साठा संपल्यामुळे मुंबईत गुरुवारी आणि शुक्रवारी लसीकरण बंद ठेवले आहे. त्यामुळे आता नागरिकांना लसीकरणासाठी थेट शनिवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. गेल्याच आठवड्यात लशींचा साठा संपल्यामुळे पालिकेला दोन दिवस लसीकरण बंद ठेवावे लागले होते.
पालिकेला शुक्रवारी १ लाख ६० हजार मात्रा मिळाल्या होत्या. हा लससाठा बुधवारपर्यंत पुरण्याची शक्यता असून पुढील साठा न आल्यास लसीकरण बंद ठेवावे लागेल असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी गेल्याच आठवड्यात सांगितले होते. बुधवारी लससाठा पूर्ण संपला तरी पुढील साठा न आल्याने पालिकेला गुरुवारी लसीकरण बंद ठेवावे लागले आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत लशींचा साठा येणार आहे. हा साठा शुक्रवारी दिवसभरात केंद्रांवर वितरित करण्यात येईल. त्यामुळे लसीकरण शनिवारी सुरू होईल.
जुलैमध्ये लशींचा साठा संपल्यामुळे पाच वेळा पालिकेला लसीकरण बंद ठेवावे लागले होते. ऑगस्टमध्ये पालिकेला सुमारे तीन लाख लशींचा साठा मिळाल्यामुळे लसीकरणावर याचा परिणाम झाला आहे. त्यात पुढील साठा वेळेत येत नसल्यामुळे लसीकरणाचा वेग आणखी मंदावण्याची शक्यता आहे.