शैलजा तिवले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लशींचा अनियमित साठा, लसीकरण केंद्रांवरील वाढती गर्दी यामुळे नागरिकांमधील असंतोष वाढत असताना खासगी लसीकरण केंद्रांवर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करू नये, असा आदेश केंद्रीय आरोग्य विभागाने दिला आहे. त्यामुळे पैसे देऊन लस घेणे परवडत असणाऱ्यांनाही आता पालिकेच्या केंद्रांवर जाऊनच लस घ्यावी लागणार आहे.

केंद्राने दिलेल्या लशींचा वापर केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी करण्याच्या स्पष्ट सूचना दिलेल्या होत्या. आता खासगी केंद्रावर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करू नये, अशी सूचना राज्याला गुरुवारी दिली आहे. त्यामुळे आता राज्यातील खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरण बंद केले जाणार आहे.

लशींचा साठा गेले काही दिवस अनियमित येत असल्याने लस मिळण्याबाबत नागरिक साशंक आहेत. त्यामुळे नागरिकांची केंद्रांवरील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आता दुसरी मात्रा घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे अनेकदा नागरिकांना रांगेत तासन्तास वाट पाहून लस न घेताच परत जावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये खासगी केंद्रांवर पैसे देऊन लस घेणे परवडत असलेल्या गटालाही यानंतर सरकारी केंद्रांवरच जाऊन लस घ्यावी लागणार आहे. त्यामुळे या केंद्रांवरील गर्दी तर वाढेलच, परंतु त्यामुळे संबंधित व्यवस्थेवरील ताणही वाढण्याची शक्यता आहे.

खासगी रुग्णालयांनी लसीकरण वाढविण्यात विशेष प्रयत्न केलेले नाहीत. काही ठिकाणी तर नागरिकांना बसण्यापासून इतर सुविधाही उपलब्ध नाहीत, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

वयानुसार केंद्र निवड…

शहरातील १३० केंद्रांपैकी ७३ खासगी केंद्रे आहेत. मुंबईत खासगी लसीकरण केंद्रांमध्ये १० ते १५ टक्के लसीकरण केले जाते. त्यामुळे ही केंद्रे सध्या बंद केली तरी मुंबईतील ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरण कार्यक्रमावर फारसा परिणाम होणार नाही, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले आहे. खासगी रुग्णालयांनाही त्यांचा साठा विकत घेऊन लसीकरण करण्याची मुभा दिली जाणार आहे. १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी मात्र ही केंद्रे उपलब्ध असतील. यांची संख्या ७३ वरून १०० पर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे, असे काकाणी यांनी सांगितले.

नागरिकांचा उत्साह पुन्हा कमी होण्याची शक्यता

करोनाच्या उपचारांमध्ये पालिकेला खासगी रुग्णालयांनी मदत केली असून लसीकरणातही मदत करत आहेत. खासगी रुग्णालयात सेवा चांगल्या उपलब्ध असून नागरिकांसाठीही सोयीस्कर आहे. त्यामुळे ही सेवा सुरू ठेवणे गरजेचे आहे. आता कुठे नागरिक लसीकरणासाठी पुढे येत आहेत. परंतु अशा रीतीने केंद्रे बंद केल्यास पुन्हा त्यांचा उत्साह कमी होईल, असे मत खासगी रुग्णालयांचे समन्वयक आणि बॉम्बे रुग्णालयाचे कन्सलटंट फिजिशियन डॉ. गौतम भन्साली यांनी व्यक्त केले.

४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण हा राष्ट्रीय कार्यक्रम असून केंद्राच्या सूचनेनुसार करावा लागेल. त्यामुळे खासगी केंद्रांवरील लसीकरण बंद करावे लागेल. परंतु यामुळे लसीकरणावर परिणाम होणार नाही. खासगीमध्ये पहिली मात्रा घेतलेल्यांना सरकारी रुग्णालयात दुसरी मात्रा दिली जाईल.

– राजेश टोपे, आरोग्यमंत्री