मुंबई : राज्यात ६० वर्षांवरील नागरिकांचा करोना प्रतिबंधक वर्धक मात्रेचा प्रतिसाद जवळपास तिपटीने वाढला आहे, तर १२ ते १४ वयोगटातील बालकांचे लसीकरण काही अंशी वाढले आहे. परिणामी राज्यातील एकूण दैनंदिन लसीकरणाची संख्या सुमारे पावणेतीन लाखांवर पोहचली आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे एकूण लसीकरण जून महिन्यापासून कमी झाले होते. तसेच १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा प्रतिसादही या काळात कमी झाला. परंतु १५ जुलैपासून राज्यभरात १८ ते ५९ वयोगटासाठी सुरू झालेल्या वर्धक मात्रेच्या लसीकरणानंतर मुले आणि ६० वर्षांवरील नागरिकांचा वर्धक मात्रेचा प्रतिसादही वाढत असल्याचे आढळले.
जूनमध्ये ६० वर्षांवरील नागरिकांपैकी वर्धक मात्रा घेणाऱ्यांची दैनंदिन सरासरी संख्या सुमारे १५ हजार होती. जुलैच्या सुरुवातीपासून यात घट होत हे प्रमाण १० हजारांच्याही खाली गेले होते. आता १८ ते ५९ वयोगटासाठी मोफत वर्धक मात्रा सुरू केल्यानंतर ६० वर्षांवरील नागरिकांचाही वर्धक मात्रेचा प्रतिसाद मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. वर्धक मात्रा घेणाऱ्या ६० वर्षांवरील नागरिकांची दैनंदिन सरासरी संख्या सुमारे ३० हजारांच्याही वर गेली आहे. शुक्रवारी राज्यात सुमारे ३७ हजार नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली.
जूनमध्ये १२ ते १४ वयोगटामध्ये पहिली मात्रा घेणाऱ्या बालकांची संख्या दैनंदिन सरासरी सुमारे दहा हजार, तर दुसरी मात्रा घेणाऱ्यांची सुमारे १५ हजार होती. जुलै महिन्यात यात काही प्रमाणात घट झाली. परंतु जुलैच्या तिसऱ्या आठवडय़ापासून पुन्हा यात काही अंशी वाढ होत आहे. शुक्रवारी तर राज्यात सुमारे २ लाख ७३ हजार जणांचे लसीकरण झाले आहे. यात सुमारे ५५ टक्के लसीकरण हे १८ ते ५९ वयोगटांतील नागरिकांच्या वर्धक मात्रेचे झाले.
ठाणे जिल्ह्यात १३४ जणांना संसर्ग
ठाणे : जिल्ह्यात रविवारी १३४ नवे करोना रुग्ण आढळले. या रुग्णांपैकी ठाणे ५०, नवी मुंबई ४५, मीरा-भाईंदर १७, कल्याण-डोंबिवली दहा, ठाणे ग्रामीण सहा, उल्हासनगर चार आणि भिवंडीत दोन रुग्ण आढळले.
राज्यात ‘बीए. ४’ आणि ‘बीए. ५’चे ३० रुग्ण
मुंबई : राज्यात ‘बीए. ४’चे दोन, तर ‘बीए. ५’ चे २८ रुग्ण आढळले आहेत. या व्यतिरिक्त बीए.२.७५ चे १८ रुग्ण आढळले. यातील २१ रुग्ण पुण्यातील आहेत, तर ठाण्यातील १३, सांगलीतील सहा, रायगडमधील चार, कोल्हापूरमधील दोन आणि अमरावती, जालना येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या जनुकीय अहवालात हे रुग्ण आढळले. त्यांचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ‘बीए.४’ आणि ‘बीए.५’ रुग्णांची संख्या १९२, तर ‘बीए. २.७५’ रुग्णांची संख्या ८८ झाली आहे.
राज्यात २०१५ नवे बाधित
राज्यात रविवारी करोनाचे २०१५ नवे रुग्ण आढळले. तर, १ हजार ९१६ रुग्ण करोनामुक्त झाले. या एकाच दिवशी मृत्यू झालेल्या सहा रुग्णांमधील प्रत्येकी दोन रुग्ण मुंबई महापालिका आणि चंद्रपूर येथील, तर ठाणे आणि साताऱ्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतील घट कायम असून सध्या १४ हजार ६९२ रुग्ण उपचाराधीन आहेत. मुंबईत रविवारी २३८ नव्या रुग्णांचे निदान झाले. तर २७४ रुग्ण करोनामुक्त झाले. सध्या मुंबईत १ हजार ८१७ रुग्ण उपचाराधीन आहेत.