शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या पोकळीत संधीचं सोनं करत सुषमा अंधारे यांनी शिवसेनेच्या नेत्या म्हणून कमी कालावधीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सुषमा अंधारे यांना शह देण्यासाठी त्यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांना उभं केलंय. वैजनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर वैजनाथ वाघमारेंना विभक्त पत्नी सुषमा अंधारेंविरोधात निवडणूक लढणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते रविवारी (१३ नोव्हेंबर) मुंबईत एबीपी माझाशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकमेकांविरोधात निवडणूक लढण्याची वेळ आली तर लढणार का? या प्रश्नावर वैजनाथ वाघमारे म्हणाले, “तशी वेळ आली तर अगदी निवडणूक लढेन. माझे नेते एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे माझा नेता, माझा पक्ष जो निर्णय देतील, जे काम करायला सांगतील ते करेन. एकनाथ शिंदेंची भूमिका चांद्यापासून बांद्यापर्यंत काम करण्याची आहे. ते सांगतील तसं मी काम करेन. माझ्यासमोर सुषमा अंधारे असू दे किंवा इतर कोणीही, मी निवडणूक लढेन.”

“सुषमा अंधारे इतिहासाचे दाखले देते हे तुम्हाला कोणी सांगितलं?”

“सुषमा अंधारे इतिहासाचे दाखले देते हे तुम्हाला कोणी सांगितलं? इतिहासाचे दाखले द्यायला तिला पुस्तक कोणी दिलं?” असा सवालही वाघमारेंनी अंधारेंना विचारला.

“त्या भाडोत्री वाहन म्हणून राष्ट्रवादीत गेल्या, त्यानंतर आमच्या नात्याला तडा”

वैजनाथ वाघमारेंनी सुषमा अंधारेंपासून वेगळे का झाले याचंही कारण सांगितलं. ते म्हणाले, “सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ नये असं मला वाटत होतं. त्या भाडोत्री वाहन म्हणून राष्ट्रवादीत गेल्या. त्यानंतर आमच्या नात्याला खरा तडा गेला. त्यांचे विचार वेगळे राहिले आणि माझे विचार वेगळे राहिले.”

“…तेव्हापासून आमच्या दोघांमध्ये कोणताही संबंध नाही”

“सुषमा अंधारे आंबेडकरी चळवळीच्या मुलुख मैदानी तोफ होत्या. मला त्यांना नेताच करायचं होतं. मला त्यांना झोपडपट्टीत पाठवायचं नव्हतं किंवा ऊसतोड कामगार, विटभट्टी कामगार म्हणून पाठवायचं नव्हतं. पण ‘चकली देणं आणि हलकी डोलकीचा तमाशा उभा करणं’ योग्य वाटलं नाही. तो त्यांचा निर्णय होता आणि तो मला मान्य नव्हता. त्यामुळे तेव्हापासून आमच्या दोघांमध्ये कोणताही संबंध नाही,” अशी माहिती वैजनाथ वाघमारे यांनी दिली.

“सुषमा अंधारे तोफ वगैरे काही नाही”

यावेळी वाघमारे यांनी सुषमा अंधारे तोफ वगैरे असं काही नाही, असं मत व्यक्त केलं. तसेच त्या ठाकरे गटात गेल्या हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असंही नमूद केलं.

हेही वाचा : Photos : सुषमा अंधारेंवर विभक्त पतीचे गंभीर आरोप, म्हणाले, “एका मंत्र्याला अश्लील आणि अश्लाघ्य…”

“सुषमा अंधारेंनी एका मंत्र्याला अश्लील आणि अश्लाघ्य पद्धतीने त्रास दिला”

विशेष म्हणजे वैजनाथ वाघमारेंनी चार दिवसात पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारेंविषयी सगळं सविस्तरपणे सांगणार असल्याचाही इशारा दिला. ते म्हणाले, “चार दिवसात सुषमा अंधारेंनी एका मंत्र्याला अश्लील आणि अश्लाघ्य पद्धतीने त्रास दिला. त्याच गावात जाऊन पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे काय चीज आहे, कोठून आल्या, काय झालं, कोणी आणलं हे सगळं सविस्तरपणे मांडणार आहे.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaijnath waghmare answer question regarding election against sushma andhare pbs
Show comments