यंदा १४ फेब्रुवारीचा दिवस रविवारी आल्याने, सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. अन्यथा, उद्या सर्व शाळांमध्ये ‘हंबरूनि वासर आले चाटती जवा गाय’ या गीताचे बोल घुमवून त्याची छायाचित्रे शिक्षणाधिकारी कार्यालयात पाठविण्याची आफत त्यांच्यावर ओढवणार होती. यंदाचा व्हॅलेण्टाइन डे रविवारी, सुट्टीच्या दिवशी आल्याने या दिवशी मातृप्रेमाची महती सांगणारे कार्यक्रम साजरे करण्याचा प्रसंग यंदा टळला आहे.
दर वर्षी १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेण्टाइन डे’ म्हणून साजरा केला जातो. अनेक शाळा-महाविद्यालयांमध्ये या दिवसाचा उत्स्फूर्त आविष्कार पाहावयास मिळू लागल्यापासून या दिवसाला राजकीय आणि सांस्कृतिक विरोधही सुरू झाला होता. याच विरोधामुळे गेल्या काही वर्षांपासून या दिवशी सांस्कृतिक संघर्षांची चिन्हे व काही ठिकाणी तणावाचे वातावरणही निर्माण झाले होते. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने तर ‘व्हॅलेण्टाइन डे’च्या विरोधात थेट भूमिका घेतल्याने हा तिढा कसा सोडवावा अशी चिंता शिक्षण क्षेत्रात व्यक्त होत होती. राज्यात सत्तांतर होऊन शिवसेना-भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या वर्षी प्रथमच, शाळांमध्ये व्हॅलेण्टाइन डेच्या उत्साहावर उतारा कसा शोधायचा या विचाराने शिक्षण क्षेत्रात चिंतेचे वातावरण होते.
सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यावर तोडगा काढला. हा दिवस पाश्चात्त्य संस्कृतीचा असल्याने काही ठिकाणी तो साजरा करण्यावर बहिष्कार टाकणे किंवा विरोध करणे असे प्रकार घडू लागल्याने, हा दिवस ‘आईचे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस’ साजरा करण्याचे सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ठरविले व तसे फर्मान शाळा-महाविद्यालयांना सोडले.
सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये १४ फेब्रुवारी रोजी, आईचे प्रेम व्यक्त करणारी, ‘हंबरूनि वासर आले चाटती जवा गाय’ हे गीत सामुदायिकरीत्या म्हटले जावे व त्याचा अहवाल छायाचित्रांसह शिक्षणाधिकारी कार्यालयास पाठवावा असे गेल्या वर्षीच्या त्या आदेशात म्हटले होते. त्या कार्यक्रमास सर्व स्तरांतून प्रसिद्धी द्यावी, असेही बजावण्यात आले होते.
व्हॅलेण्टाइन डे हा दिवस दर वर्षीच येत असल्याने, शिक्षणाधिकाऱ्यांच्या त्या आदेशाची यंदाही अंमलबजावणी करावी लागणार की काय, हा प्रश्न रविवारमुळे निकाली निघाला आणि शिक्षक-मुख्याध्यापक व जिल्ह्याच्या महाविद्यालयांमधील प्राचार्यानी सुटकेचा नि:श्वास टाकला.
आता शाळा-महाविद्यालये मुद्दाम भरवून त्यामध्ये या समूहगानाचा कार्यक्रम साजरा करावा लागणार नाही, या जाणिवेने सारे जण सुखावले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा