वडाळ्यातील पालिका शाळा संकुलातील आंधळा कारभार ; १२० पैकी ३० तुकडय़ांतील विद्यार्थी वर्गाअभावी वाऱ्यावर
महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याची ओरड एकीकडे केली जात असताना, विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडण्याचा पालिकेचा कारभार वडाळ्यातील परिस्थितीद्वारे चव्हाटय़ावर आला आहे. वडाळा येथील वामनराव महाडिक शाळा संकुलात सात हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, यापैकी तीन माध्यमांच्या नऊ प्राथमिक आणि एका माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वर्गखोल्या नसल्याने जिना, प्रवेशद्वार, व्हरांडा येथे बसून धडे गिरवावे लागत आहेत. या शाळा संकुलात स्वच्छता, शौचालये, सुरक्षा यांची वानवा आहेच; परंतु येथे शिक्षकही टिकत नसल्याने विद्यार्थ्यांची पटसंख्या रोडावू लागली आहे.
विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरू लागल्याने शहरातील अनेक पालिका शाळा बंद करण्याची वेळ प्रशासनावर ओढवली. मात्र, याला वडाळा परिसरातील अॅन्टॉप हिल परिसरामधील वामनराव महाडिक शाळा संकुल पूर्णपणे अपवाद आहे. या संकुलात मराठी माध्यमाच्या दोन, हिंदी माध्यमाच्या दोन आणि उर्दू माध्यमाच्या पाच अशा नऊ प्राथमिक शाळा, तर एक उर्दू माध्यमिक शाळा भरतात. या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये एकूण १२० तुकडय़ा असून सुमारे सात हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
इतक्या मोठय़ा संख्येने विद्यार्थी शिकत असताना या संकुलाकडे पालिका प्रशासनाने पुरेपूर लक्ष देऊन सर्व सुविधा पुरवण्याची गरज होती. परंतु, प्रत्यक्षात येथे विद्यार्थ्यांना बसायलाही जागा नाही. वर्गखोल्या कमी असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून व्हरांडा, जिना, प्रवेशद्वार अशा मिळेल त्या जागेत विविध तुकडय़ांचे वर्ग भरत आहेत. वर्ग सुरू असताना एखादी व्यक्ती जिन्यातून खाली उतरत असताना बसलेल्या विद्यार्थ्यांमधून वाट काढावी लागते. जागा नसल्याचे चार वेगवेगळ्या इयत्तांचे वर्ग एकाच हॉलमध्ये भरविले जातात. या चारही वर्गामध्ये एकाच वेळी चार शिक्षक वेगवेगळे विषय संबंधित वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवत असतात. बालवाडीचे वर्ग चक्क शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच भरवले जातात. १२० पैकी ३० इयत्तांमधील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्गच नसल्याचे उघडकीस आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा