वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या युतीची बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचं औचित्य साधून घोषणा करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या युतीची घोषणा केली. तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखाताई ठाकूर उपस्थित होत्या. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं.
“अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मार्फत राजकीय नेतृत्व संपवण्याचं काम सुरु आहे. पैसे खाल्ले असतील तर न्यायालयात घेऊन जात जेलमध्ये टाका. पण, न्यायालयात न जाता नेतृत्वावर आक्षेप घेतला जात आहे. आपण कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलो नाही. एकदिवस आपलाही अंत होणार आहे. तसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही अंत होणार आहे,” असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे.
हेही वाचा : ठाकरे गट-वंचितमधील युतीच्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आमच्या…”
“नरेंद्र मोदींनी स्वत:च्या पक्षातील नेतृत्व संपवलं आहे. कोणत्याही नेत्याला उभारी घेऊ दिली जात नाही. केंद्रातील अनेक मंत्री भेटल्यावर सांगतात आम्ही फक्त फाईल्स संभाळण्याचं काम करतो,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
हेही वाचा : ठाकरे-आंबेडकरांची युती, मात्र वंचित महाविकास आघाडीचा भाग असेल का? उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही यासंदर्भात…”
“बाबासाहेबांनी सांगितलं होतं की, संक्रमणाच्या काळात राजकीय नेतृत्व घडत असते. त्यामुळे महाराष्ट्र अथवा बाहेरील प्रादेशिक पक्ष स्वत:चं नेतृत्व आणि संघटन उभं करत असतील, तर त्यांना आम्ही मदत करणार आहोत. राजकारण विवेक आणि नितीमत्तेवर येण्यासाठी उद्धव ठाकरेंसह प्रयत्न करु,” असेही प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं.