लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या एल विभाग कार्यालयातर्फे १५ फेब्रुवारी रोजी कुर्ला नेहरू नगर येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. मात्र, या कारवाईपूर्वी महानगरपालिकेकडून निष्कासनासंदर्भात कोणतीही नोटीस मिळाली नाही. तसेच, पूर्वसूचनेविना कार्यालय जमीनदोस्त करण्यात आले, असा आरोप वंचित बहुजन आघाडीतील कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. पालिकेच्या या कारभाराविरोधात २२ फेब्रुवारी रोजी वंचित बहुजन आघाडीतर्फे पालिकेच्या एल विभाग कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
कुर्ला येथील वंचितच्या कार्यालयामध्ये जवळपास २ वर्षांपासून अंगणवाडीत लहान मुलांना शिक्षण दिले जाते. त्यानुसार, १५ फेब्रुवारी रोजीही कार्यालयात बालवाडीचे वर्ग सुरू होते. मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता महानगरपालिकेचे कर्मचारी आणि पोलीस कार्यालयाबाहेर जमा झाले आणि निष्कासनाच्या कारवाईला सुरुवात केली, असा आरोप वंचितच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या कारवाईदरम्यान, बालवाडीत शिकत असलेल्या मुलांपैकी काहीजण किरकोळ जखम झाली. असेही त्यांनी सांगितले.
आणखी वाचा-बीडीडी प्रकल्पात आता प्रत्येकाला पार्किंग हवे! म्हाडावर अडीचशे कोटींचा बोजा?
महानगरपालिकेने कार्यालय जमीनदोस्त केल्यानंतर वंचित कार्यकर्त्याच्या नजीकच्या चहाच्या टपरीवरही हातोडा चालविला. मात्र, चहाच्या टपरीशेजारी असलेल्या इतर पक्षाच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली नाही, असा आरोप वंचितचे कुर्ला तालुका अध्यक्ष स्वप्नील जवळगेकर यांनी केला आहे. ही कारवाई केवळ बड्या नेत्याच्या सांगण्यावरून तसेच कुर्ला भागात वंचित बहुजन पक्षाचे वाढते प्रस्थ रोखण्यासाठी करण्यात आली आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
पालिकेने या कारवाईची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी केल्यामुळे वंचित बहुजन आघाडीतर्फे पालिकेच्या एल विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पालिकेने येत्या २२ फेब्रुवारीपर्यंत तोडलेले कार्यालय पुन्हा बांधावे आणि कोणतीही नोटीस न देता कार्यालय निष्कासित करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, या मागण्यांसाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.