उत्तरासाठी दहा दिवसांची मुदत; आघाडीबाबत थेट चर्चेचे आवाहन

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर युती करण्याची तयारी दाखवून वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला ४० जागा देऊ केल्या आहेत. या प्रस्तावावर दहा दिवसांत उत्तर द्यावे, अशी निर्वाणीची मुदतही आघाडीच्या नेत्यांनी काँग्रेसला दिली आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीबरोबर समझोता करण्याचा विचार काँग्रेसमध्ये सुरू आहे. अलीकडेच  राहुल गांधी यांनी दिल्लीत राज्यातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली, त्यातही वंचित आघाडीबरोबर युती करण्याबाबत चर्चा झाली. आघाडीबरोबर बोलणी करण्यासाठी माणिकराव ठाकरे व हर्षवर्धन पाटील या नेत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र आता वंचित आघाडीने वेगळाच सूर लावल्यामुळे काँग्रेसबरोबर निवडणूक समझोता होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर, संसदीय मंडळाचे सदस्य अण्णाराव पाटील, अशोक सोनोने व सचिव डॉ. अरुण सावंत यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबरच्या संभाव्य युतीबाबतची आघाडाची भूमिका जाहीर केली. वंचित आघाडीबरोबर युती करण्याबाबत वर्तमानपत्रांमधून चर्चा करणे ही काँग्रेसची नेहमचीच खेळी आहे. मात्र अद्यापपर्यंत काँग्रेसने आघाडीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांशी अधिकृतपणे तशी चर्चा केलेली नाही वा प्रस्तावही दिला नाही.

युतीबाबत आघाडीची भूमिका अडमुठी असल्याचा संभ्रम लोकांमध्ये पसरविला जातो, त्यामुळे आम्हीच आता काँग्रेसला युतीचा प्रस्ताव देत आहोत, असे पडळकर व पाटील यांनी सांगितले.

अन्यथा माफी मागा

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने भाजपचा ब संघ म्हणून काम केले, असा काँग्रेसने आरोप केला. हे काँग्रेसने सप्रमाण, कागपत्रांसह सिद्ध करून दाखवावे, अन्यथा आघाडीला मतदान करणाऱ्या ४१ लाख मतदारांची माफी मागावी, अशी मागणी या आधीच आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. अण्णाराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत त्याचा पुनरुच्चार केला.

Story img Loader