लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : रेल्वे प्रशासनाने त्यांची आगाऊ आरक्षण प्रणाली अद्यायावत करून, वंदे भारत, तेजस एक्सप्रेस रेल्वेगाड्यांचे तिकीट उपलब्ध केले आहे. त्यामुळे कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रेल्वेने आगाऊ आरक्षण कालावधी ६० दिवस केला आहे. त्यामुळे कोणत्याही गाडीचे आगाऊ तिकीट ६० दिवसांच्या कालावधीमध्ये काढता येते. परंतु, कोकणातील वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस आणि एलटीटी-मडगाव गाड्यांचे १५ जूननंतरचे तिकीट प्रवाशांना मिळत नव्हते. त्यामुळे या गाड्या पावसाळ्यात धावणार की नाहीत, असा प्रश्न पडला होता.
याबाबत ‘लोकसत्ता’ने ‘वंदे भारत, तेजस एक्स्प्रेसला ब्रेक?’ असे वृत्त प्रकाशित करून प्रवाशांना होणाऱ्या त्रासाला वाचा फोडली. त्यानंतर मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे प्रवाशांना वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस आणि एलटीटी-मडगाव रेल्वेगाड्यांचा प्रवास पावसाळ्यातही करता येणार आहे.