मुंबई : मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाच्या अनियोजित कारभारामुळे पावसाळ्यात कोकणात वंदे भारत धावणार की नाही, असा गोंधळ निर्माण झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर १० जूननंतरची कोकणातील वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याचा संदेश दिसत आहे. त्यामुळे पावसाळ्यात या दोन्ही एक्स्प्रेस गाड्या धावणार नाहीत, असे संकेत मिळत आहेत.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवासी सुरक्षेसाठी कोकण रेल्वेवर दरवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रक लागू केले जाते. मात्र, रेल्वेवरील नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षण प्रवासाच्या १२० दिवस आधी सुरू होते. त्यामुळे कोकण रेल्वेवरील पावसाळी वेळापत्रकानुसार होणारे बदलही आरक्षण प्रणालीत तेव्हाच नोंद होणे अपेक्षित आहे. परंतु हे बदल न झाल्याने प्रवाशांना १० जूनपासून ऑगस्ट महिन्यापर्यंतची तिकिटे आरक्षित करण्यास अडचणीचे ठरत आहे.
हेही वाचा – परीक्षेस हजर राहूनही गैरहजरचा शिक्का
गेल्या दोन महिन्यांपासून १० जूननंतरची तिकिटे काढता येत नसल्याने पावसाळ्यात कोकणातील वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस धावणार नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले, कोकण रेल्वेने पावसाळी वेळापत्रक पाठवले नसल्याने रेल्वेगाड्यांच्या वेळा ठरवता आल्या नाहीत. तर, आयआरसीटीसी प्रशासनाशी मोबाइलवरून संपर्क साधण्याचा, तसेच संदेशाद्वारे विचारणा करण्यात आली असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
हेही वाचा – मेट्रो ६ चे बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी ‘आरे’तील जमिनीचा वापर
१० दिवसांत गणेशोत्सवाचे आरक्षण
गेल्या दोन महिन्यांपासून पावसाळ्यातील वंदे भारत, तेजस एक्स्प्रेसची तिकिटे आरक्षित करता येत नाही. अशीच परिस्थिती पुढील १० दिवस राहिली तर, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास खडतर होईल. पुढील १० दिवसांत गणेशोत्सव काळातले आरक्षण सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर मध्य आणि कोकण रेल्वेने लवकरात लवकर पावसाळी वेळापत्रकाची नोंद प्रवासी आरक्षण प्रणालीत करून सर्व रेल्वेगाड्यांचे आरक्षण सुरू करण्याची गरज आहे, असे प्रवासी प्रथमेश प्रभू यांनी सांगितले.