मुंबई : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू होणार आहे. या वेळापत्रकानुसार रेल्वेगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, मध्य आणि कोकण रेल्वेच्या ढिसाळ कारभारामुळे गेल्या दोन महिन्यांपासून प्रवाशांना १० जूननंतरची वंदे भारत, तेजस एक्स्प्रेसचे तिकीट काढता येत नव्हते. त्यामुळे प्रवाशांमध्ये पावसाळ्यात विशेषतः गणेशोत्सव काळात वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस धावेल की नाही, अशी शंका निर्माण झाली होती. यासंदर्भातील वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध होताच रेल्वे मंडळ, रेल्वे प्रशासनाला जाग आली. त्यानंतर त्यांनी दोन महिन्यांपासून रखडलेले नियोजन दोन दिवसात पूर्ण केले. त्यामुळे आता प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस आणि एलटीटी-मडगाव एक्स्प्रेसची तिकिटे काढता येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेवरील कोलाड ते ठोकूर या ७४० किमी पट्ट्यात मान्सूनपूर्व कामे हाती घेण्यात येतात. तसेच मुसळधार पावसात दृश्यमानता कमी होत असल्याने सर्व रेल्वेगाड्या नियंत्रित वेगाने चालवल्या जातात. यासह रेल्वे प्रवासी सुरक्षेसाठी कोकण रेल्वेवर दरवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रक लागू केले जाते. पावसाळी वेळापत्रकाचा सर्वात जास्त फटका अतिजलद रेल्वेगाड्यांना बसत असून एका दिवसात मुंबईहून गोव्यात जाऊन परत येणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आठवड्यातील दिवस कमी होतात. यात तेजस एक्स्प्रेस आठवड्यातून पाचऐवजी तीन आणि वंदे भारत एक्स्प्रेस सहाऐवजी तीन दिवस धावते. मात्र,रेल्वे प्रशासनाने वंदे भारत आणि तेजस एक्स्प्रेसचे वेळापत्रक तयार केले नसल्याने, तिकिटांचे नियोजन फिसकटले. त्यामुळे तिकीट आरक्षण प्रणालीवर वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस १० जूननंतर रद्द असल्याचे दाखविले जात होते. यासंदर्भातील वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाले. रेल्वे मंडळाने या वृत्ताची दखल घेतली. तर कोकण रेल्वेने यासंदर्भात अधिसूचना, माहिती पत्र जारी केले. परिणामी, २६ एप्रिलपासून तिन्ही रेल्वेची १० जूननंतरची तिकीटे काढणे शक्य झाले आहे.

हेही वाचा – रवी किशन यांच्या डीएनए चाचणीची मागणी न्यायालयाने फेटाळली

आठवड्यातील सहाऐवजी तीनच दिवस वंदे भारत धावणार

पावसाळी वेळापत्रकानुसार, गाडी क्रमांक २२२२९/२२२३० सीएसएमटी – मडगाव – सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातील सहाऐवजी तीन दिवस धावेल. गाडी क्रमांक २२२२९ सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सीएसएमटीवरून सुटेल. तर गाडी क्रमांक २२२३० मडगाव – सीएसएमटी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी मडगाववरून सुटेल.

तेजस एक्स्प्रेसही तीनच दिवस धावणार

पावसाळी वेळापत्रकानुसार, गाडी क्रमांक २२११९ / २२१२० सीएसएमटी – मडगाव – सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस आठवड्यातील पाचऐवजी तीन दिवस धावेल. गाडी क्रमांक २२११९ सीएसएमटी ते मडगाव तेजस एक्स्प्रेस मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी धावेल. तर, गाडी क्रमांक २२१२० मडगाव ते सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस बुधवार, शुक्रवार आणि रविवारी धावेल.

हेही वाचा – मुंबई : रेल्वेगाड्यांमध्ये तुडूंब गर्दी

गाडी क्रमांक ११०९९ एलटीटी- मडगाव एक्स्प्रेस शुक्रवार आणि रविवारी धावेल. तर गाडी क्रमांक १११०० मडगाव – एलटीटी एक्स्प्रेस शनिवारी आणि सोमवारी धावेल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vande bharat tejas express will run during monsoon mumbai print news ssb