मातोश्रीच्या अंगणात ठाकरेंची सरशी, वरुण सरदेसाई ११३६५ मतांनी विजयी

एक्झीट पोलमध्ये वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेचा (एकनाथ शिंदे) विजय होईल, असा दावा करण्यात आला होता. मात्र हा दावा खोटे ठरवत पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या सरदेसाई यांनी विजय मिळवला.

Vandre East constituency result Shivsena Uddhav Thackeray's Varun Sardesai won against Zeeshan Baba Siddique mumbai
(Photo Courtesy- FE)

मुंबई : मातोश्रीच्या अंगणात अर्थात वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील तिरंगी आणि अतितटीच्या लढाईत अखेर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवाराने वरुण सरदेसाई यांनी अखेर बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) झिशान सिद्दिकी यांचा सरदेसाई यांनी ११ हजार ३६५ मतांनी पराभव केला. एक्झीट पोलमध्ये वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेचा (एकनाथ शिंदे) विजय होईल, असा दावा करण्यात आला होता. मात्र हा दावा खोटे ठरवत पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या सरदेसाई यांनी विजय मिळवला. विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीतील शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पराभवाचा वचपा यावेळी काढला.

वांद्रे पूर्व मतदारसंघ शिवसेनेचा गड मानला जातो. विधानसभेच्या २००९, २०१४ मधील निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून शिवसेनेचे बाळा सावंत विजयी झाले होते. मात्र २०१५ मध्ये बाळा सावंत यांचे निधन झाले. यानंतर झालेल्या पोटनिडणुकीत बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत या विजयी झाल्या होत्या. पण त्यानंतर २०१९ मध्ये मात्र शिवसेनेने तृप्ती सावंतऐवजी विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिल्याने नाराज तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली. बंडखोरीचा परिणाम म्हणून महाडेश्वर यांचा पराभव झाला आणि बंडखोरीचा फायदा काँग्रेसच्या झिशान सिद्दिकी यांना झाला. झिशान सिद्दिकी येथून विजयी झाले. २०२४ मध्ये २०१९ चीच पुनरावृत्ती होईल असे म्हटले जात होते. यावेळीही येथे तिरंगी लढत होती. भाजपमध्ये गेलेल्या तृप्ती सावंत यांनी अचानक मनसेमध्ये प्रवेश करीत वांद्रे पूर्व येथून उमेदवारी मिळवली.

तृप्ती सावंत यांच्या उमेदवारीमुळे मराठी मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) झिशान सिद्दिकी यांना होईल आणि ते विजय होतील अशीच चर्चा होती. तर बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे झिशान सिद्धीकी यांना सहानुभूतीची लाट तारेल असेही म्हटले जात होते. मात्र वरुण सरदेसाई यांनी १९ पैकी केवळ एक फेरी वगळता १८ फेऱ्यांमध्ये आघाडी कायम ठेवली आणि अखेर ११ हजार ३६५ मतांनी विजय मिळवला. वरुण सरदेसाई यांना एकूण ५७ हजार ७०८ मते मिळाली, तर झिशान सिद्दीकी यांना ४६ हजार ३४३ मते मिळाली. त्याचवेळी तृप्ती सावंत यांच्या पारड्यात १६ हजार ०७४ मते पडली. दरम्यान शिवसेनेचा (उद्धव ठाकरे) या मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजयी झाला असला तरी या विजयाचा जल्लोष वांद्रे पूर्व परिसरात म्हणावा तसा होताना दिसला नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vandre east constituency result shivsena uddhav thackerays varun sardesai won against zeeshan baba siddique mumbai print news dvr

First published on: 23-11-2024 at 19:06 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या