Vandre West Assembly constituency 2024 BJP Ashish Shelar : वांद्रे पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघात येतो. २००९ साली झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघावर काँग्रेस आणि भाजपाची पकड आहे. भाजपा नेते आशिष शेलार हे येथील विद्यमान आमदार आहेत. मागील दोन निवडणुकांमध्ये त्यांनी वांद्रे पश्चिमची जागा जिंकली आहे. हा मतदारसंघ तयार झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीत म्हणजेच २००९ च्या निवडणुकीत बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसच्या तिकीटावर येथून विजय मिळवला होता. मात्र, २०१४ मध्ये आशिष शेलार यांनी हा मतदारसंघ सिद्दीकी यांच्याकडून हिसकावला. २०१९ मध्ये देखील शेलार यांनी आपला गड कायम राखला. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीकडून सिद्दीकी यांना कोणता राजकीय फायदा होणार हे अजून उघड झालेलं नाही. मात्र सिद्दीकींचा काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा आणि मित्र पक्षातच प्रवेश करण्याचा निर्णय भाजपला फायदेशीर ठरणार आहे.
वांद्रे पश्चिम मतदारसंघात अल्पसंख्यांकाची मतं निर्णायक आहेत. बाबा सिद्दीकी यांना या मतदारसंघात अजूनही जनाधार आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) प्रवेश केल्याने या मतदारसंघातील विद्यमान आमदार व मुंबई भाजपचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांचा आगामी निवडणुकीतील विजयाचा मार्ग सुकर झाला आहे, असं म्हणता येईल. २०१४ मध्ये शेलार व सिद्दीकी यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी शेलार मोठ्या फरकाने निवडून आले होते. २०१९ मध्ये सिद्दीकी निवडणूक रिंगणाच्या बाहेर राहिले, त्यामुळे शेलार पुन्हा चांगल्या मताधिक्यांनी निवडून आले. या मतदारसंघावर काँग्रेस व भाजपाची पकड आहे. दोन्ही पक्षातील मोठे नेते महायुतीत असल्यामुळे हा मतदारसंघ महायुतीचा बालेकिल्ला बनला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत या मतदारसंघात भाजपाने शेलार यांना उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडी त्यांच्यासमोर कोणाला उभं करणार हा मोठा प्रश्न आहे.
हे ही वाचा >> काँग्रेस मालाड पश्चिमचा गड राखणार की महायुती मुसंडी मारणार?
भाजपाचा गड मजबूत
देशातील अल्पसंख्याक मुस्लीम समुदाय भाजपाविरोधात असल्याचं चित्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये पाहायला मिळालं आहे. त्यामुळे वांद्रे पश्चिममधील (Vandre West Assembly constituency) अल्पसंख्याकांची मतं देखील भाजपच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. अशा वेळी मतदारसंघात चांगला जम असलेला बाबा सिद्दीकी यांच्यासारखा मुस्लीम नेता काँग्रेसमधून बाहेर पडल्याने व राष्ट्रवादीत सहभागी झाल्याने वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाला फायदा होणार असल्याचे मानले जात आहे.
हे ही वाचा >> घाटकोपर पश्चिम मतदारसंघात महायुतीची वाट खडतर, लोकसभेनंतर चिंता वाढली!
बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान वांद्रे पूर्व मतदारसंघातील (Vandre West Assembly constituency) आमदार आहे. त्यांनी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसवरही नाराजी व्यक्त करुन, तेही राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे संकेत दिले आहेत. मागील निवडणुकीत शिवसेनेतील मतविभाजनामुळे झीशान निवडून आले होते. मात्र, यावेळी झीशान कोणत्याही पक्षाकडून विधानसभेच्या रिंगणात उतरले तरी त्यांचा मार्ग खडतर असेल.
Vandre West Assembly constituency : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल
आशिष शेलार (भाजपा) – ७४,८१६ मतं
असिफ झकारिया (काँग्रेस) – ४८,३०९ मतं
हे ही वाचा >> जोगेश्वरी पूर्व मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच, मविआतही संघर्ष! यंदा नवा आमदार मिळणार
Vandre West Assembly constituency : २०१४ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल
आशिष शेलार (भाजपा) – ७४,७७९ मतं
बाबा सिद्दिकी (काँग्रेस) – ४७,८६८ मतं
हे ही वाचा >> Andheri East Assembly Constituency : ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात महायुतीची ताकद पणाला, भाजपा-शिंदेंना आव्हान पेलणार का?
Vandre West Assembly constituency : २००९ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल
बाबा सिद्दिगी (काँग्रेस) – ५९,६५९ मतं
आशिष शेलार (भाजपा) – ५७,९६८ मतं
ताजी अपडेट
वांद्रे पश्चिम मतदारसंघात आशिष शेलार यांच्यासमोर काँग्रेसने आसिफ झकारिया यांना उभं केलं आहे. या मतदारसंघात एकूण १० उमेदवार उभे आहेत. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात मतदान पार पडलं. राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांचा टक्का वाढल्याचं चित्र आहे.मुंबई उपनगरांत ५५.७७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. धारावीत मतदारांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
l