मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील निसर्ग माहिती केंद्रातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही १ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने विविध माहितीपर कार्यक्रम, निसर्ग सहली, कार्यशाळा, प्रदर्शन आणि इतर शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिक आणि निसर्गप्रेमींनी या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय उद्यानातर्फे करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> मुंबई: रिक्षा-टॅक्सीचा पाच किलोमीटरपर्यंतचा प्रवास महागला; रात्रीच्या प्रवासासाठी खिशाला खार
दरवर्षीप्रमाणे यंदाही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून सप्ताह कालावधीत दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत पहिले सत्र, सकाळी ११.३० ते दुपारी २ दरम्यान दुसरे सत्र आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ या कालावधीत तिसरे सत्र पार पडेल. या सत्रांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. निसर्ग सहलीच्या माध्यमातून राष्ट्रीय उद्यानातील विविध निसर्ग पायवाटांची सफर करता येणार आहे आणि यादरम्यान प्राणी, पक्षी, फुलपाखरे, झाडे याबाबत निसर्गतज्ज्ञ विस्तृत माहिती देणार आहेत. त्याचसोबत आपला सांस्कृतिक वारसा आणि इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी कान्हेरी लेणी येथे ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन करण्यात आले आहे. नव्याने सुरू झालेल्या मांजर कुळातील प्राण्यांचे माहिती केंद्र आणि मृगायचिन्ह केंद्र (टॅक्साईडरमी केंद्र ), फुलपाखरू उद्यान आणि ऑर्किड गार्डनचेही दर्शन घडणार आहे. येत्या १ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहाचे उदघाटन करण्यात येणार आहे. याप्रसंगी ‘मुंबईतील नद्यांचे संवर्धन’ या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. वन्यजीव सप्ताहाचे विस्तृत वेळापत्रक राष्ट्रीय उद्यानाच्या (Sanjay Gandhi National Park) या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी शुभम हडकर यांच्याशी मोबाइल क्रमांक ७७३८७७८७८९ वर संपर्क साधावा.