‘मुंबईमध्ये उपनगरीय रेल्वेवर खूपच जास्त भार पडतो. रेल्वेच्या उपनगरीय सेवेला काही मर्यादा आहेत. त्यामुळे प्रवाशांनीही रेल्वेने प्रवास करण्याऐवजी बससारख्या वाहनांनी प्रवास करावा..’ असा अनाहूत सल्ला रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी मुंबईकरांना दिला. रेल्वेशी संबंधित प्रश्नांवर मुंबईत विविध शिष्टमंडळांशी चर्चा करताना प्रवासी महासंघाच्या महिला प्रतिनिधींच्या प्रश्नावर हे उत्तर दिले. मुंबईकरांच्या समस्या समजून उपाययोजना करण्याऐवजी त्यांना असा ‘सल्ला’ दिल्याने खरगे यांच्याबद्दल तीव्र नाराजी उमटत आहे.
मोनिका मोरे अपघात प्रकरणानंतर रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांबाबत जागरूक झालेल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहात खरगे यांची भेट घेतली. रेल्वे आणि फलाट यामधील पोकळी हा चर्चेचा मुख्य विषय होता. उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या महिला प्रतिनिधी लता अरगडे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रतिनिधींसह रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी रेल्वे गाडय़ांना होणारी गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा या रेल्वेमंत्र्यांसमोर मांडला. त्यावर ‘प्रवासी रेल्वेवर खूपच भार टाकत आहेत. हा ताण न झेपणारा आहे. तुम्ही बसच्या फेऱ्या वाढवण्यावर भर द्यायला हवा. प्रवाशांना बसने प्रवास करण्याचा सल्ला द्या! रेल्वे स्वस्त म्हणून सर्वच जण रेल्वेने प्रवास करतात. प्रवाशांनी रेल्वेऐवजी बसने प्रवास करायला हवा,’ असे उलट उत्तर खरगे दिले.
रेल्वेमंत्र्यांनी केलेले हे विधान ऐकून आपणही चक्रावलो. त्यांच्या या विधानापुढे काय बोलावे, हे आपल्याला सुचलेच नाही. मात्र रेल्वेमंत्री रस्त्याने प्रवास करताना त्यांच्या आगेमागे लाल दिव्याच्या गाडय़ांचा ताफा असतो. त्यामुळे त्यांना मुंबईतील वाहतूक कोंडीची कल्पना नाही, अशी टीका अरगडे यांनी केली. ‘आपण बंगळुरू ते दिल्ली रेल्वेने प्रवास करतो, असेही रेल्वेमंत्री सांगतात. मात्र प्रथमश्रेणी डब्यातून ७०० किलोमीटर प्रवास करण्याऐवजी रेल्वेमंत्र्यांनी गर्दीच्या वेळी सीएसटी-डोंबिवली प्रवास करून दाखवावा,’ असे त्यांनी सुनावले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा