मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडले. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदान केंद्रांवर उपलब्ध केलेल्या सोयी-सुविधांमुळे मतदानाची प्रक्रिया अत्यंत सुरळीत पार पडल्याचा अनुभव मतदारांना आला. मतदान केंद्रांवर सर्वसामान्य मतदार, अंपंग आणि वृद्धांसाठी विविध सोयी – सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. मात्र मतदारांमध्ये मतदान करण्याबाबत निरुत्साह दिसून आला. संध्याकाळपर्यंत जेमतेम ५० टक्के मतदान झाले होते. मतदारयादीत नाव नसणे, मतदान केंद्र बदललेले असणे असे अनुभवही मतदारांना आले. मात्र विविध सोयी-सुविधा उपलब्ध केल्यामुळे मतदान केंद्रांवर कुठेही रांगा दिसत नव्हत्या. मतदारांना घरातून बाहेर काढण्यासाठी राजकीय पक्षांची मात्र कसोटी लागत होती.
विधानसभा निवडणुकीसाठी यावेळी निवडणूक आयोगाने प्रथम महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे यावेळी निवडणुकीचे संपूर्ण नियोजन मुंबई महापालिकेने केले होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. संध्याकाळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे निवडणुकीच्या नियोजनाबाबत सर्व स्तरातून टीका झाली होती. तशी परिस्थिती यावेळी होऊ नये म्हणून पालिका प्रशासनाने विशेष दक्षता घेतली होती. मतदान केंद्रांची संख्या वाढविल्यामुळे यावेळी मतदान केंद्रांवर कुठेही गर्दी झाली नव्हती. मतदार अक्षरश: १० मिनिटांत मतदान करून बाहेर पडत होते. रांगेत असलेल्यांसाठी बसण्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे यावेळी मतदान सुसह्य झाले होते. मतदान केंद्रांवर एनएसएसचे विद्यार्थी मदतीसाठी तैनात होते. त्यामुळे मतदान कक्ष शोधणे अधिक सोपे झाले होते.
हेही वाचा >>> पोलिसांविरुद्धच्या नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जात नाही; उच्च न्यायालयाची टिप्पणी
मुंबईतील एकूण ३६ पैकी १० मतदारसंघ शहर भागात असून २६ मतदार संघ उपनगरात आहेत. ३६ मतदारसंघात एकूण ४२० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यापैकी शहर भागात १०५, तर उपनगरात ३१५ उमेदवार होते.या उमेदवारांना मुंबईतील मतदारांनी दिलेला कौल मतपेटीत बंद झाला.
लोकसभेच्या तुलनेत यावेळी मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली होती. एकूण १० हजार ११७ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. या सर्व केंद्रांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, प्रतीक्षालय, रांगेत बसण्याची व्यवस्था, दिव्यांगांसाठी व्हिलचेअर, रॅम्प, मदतीसाठी दिव्यांगमित्र स्वयंसेवक, मैदानाच्या ठिकाणी मंडप, कचरापेटी, पंखे, पुरेशी प्रकाश व्यवस्था आदी सुविधा करण्यात आल्या होत्या. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरूवात झाल्यानंतर मतदान केंद्रांवर बहुतांशी ठिकाणी सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला. तर सकाळी धावायला, चालायला जाणाऱ्यांनीही सकाळी मतदान केले. कामावर जाणाऱ्यांनीही सकाळी मतदानासाठी हजेरी लावली. नेहमीप्रमाणे दुपारनंतर मतदानाचा जोर थोडा ओसरला होता.
हेही वाचा >>> Amit Thackeray: “आम्ही अमित ठाकरेंना मदत करतोय, कारण…”, माहीम विधानसभेत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा महायुतीला हरताळ?
पालिकेने अपंग आणि वृद्ध मतदारांसाठी व्हिलचेअर आणि वाहनांची सोय केली होती. त्यामुळे अपंग व वृद्धांचा मतदानाचा उत्साह सर्वत्र दिसून आला. मतदान केंद्रावर मोबाइल बंदीच्या नियमाचेही बऱ्यापैकी पालन होत होते. जनजागृतीमुळे मतदारांनीही मोबाइलबाबत सहकार्य केले. मात्र सेल्फी पॉईंट असूनही मतदारांना आपली छायाचित्रे घेता आली नाहीत.
निवडणुकीमुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी होती. ठिकठिकाणी नाक्यानाक्यावर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे घोळके दिसत होते. मतदारांना मतदानासाठी मतदान केंद्रावर आणण्याकरीता राजकीय कार्यकर्ते घरोघरी फिरत होते. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते नाक्यानाक्यावर मतदारयाद्या घेऊन भरले होते. मात्र यावेळी मोबाइल ॲपमध्ये नाव आणि मतदान केंद्र पाहता येत असल्यामुळे या टेबलांभोवती फारशी गर्दी दिसत नव्हती. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मुंबई उपनगरातील भांडुप परिसरात सर्वाधिक ६०.१८ टक्के मतदान झाले. या मतदारसंघात शिवसेना (उद्धव ठाकरे) विरुद्ध शिवसेना (एकनाथ शिंदे) अशी लढत होत आहे. शिवसेनेने (उद्धव ठाकरे) रमेश कोरगावकर यांना, तर शिवसेनेने (एकनाथ शिंदे) अशोक पाटील यांना रिंगणात उतरविले आहे. तर मनसेचे शिरीष सावंत हेही या मतदारसंघात उभे आहेत. या मतदारसंघात मनसेचेही मतदार मोठ्या संख्येने आहेत. शहर भागात माहीम मतदारसंघात सर्वाधिक ५५ टक्के मतदान झाले. या मतदारसंघात शिवसेनेचे (एकनात शिंदे) सदा सरवणकर, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) महेश सावंत यांच्यात लढत होत आहे. तर सर्वात कमी मतदान चांदिवली मतदारसंघात झाले. त्याखालोखाल वर्सोवा, मानखुर्द शिवाजीनगर परिसरात सर्वात कमी मतदान झाल्याचे आढळून आले.