मुंबई: जगातील विकसित देशांच्या तुलनेत भारतामध्ये उत्तम आरोग्य सुविधा आणि स्वस्त दरात उपचार मिळतात. मात्र हे उपचार भारतातील सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर आहेत. कर्करोगापासून सर्व उपचार नागरिकांच्या आवाक्यात आणण्यासाठी वैद्यकीय उपकरणे आणि औषधांवर आकारण्यात येणारा अव्वाच्या सव्वा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कमी करावा, अशी मागणी देशातील विविध वैद्यकीय संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केली आहे. या मागणीची पूर्तता व्हावी यासाठी इंडियन कॅन्सर काँग्रेसही (आयसीसी) प्रयत्न करेल, असे आश्वासन आयसीसीचे प्रमुख आयोजक डॉ. संजय शर्मा यांनी दिले.
केंद्र सरकारने वैद्यकीय उपकरणे आणि औषधांवर १८ टक्के वस्तू आणि सेवा कराची आकारणी केली आहे. यामुळे वैद्यकीय उपकरणे व औषधांच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. परिणामी, देशातील उपचारांवरील खर्चामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अन्य विकसित देशांच्या तुलनेत भारतामध्ये वैद्यकीय उपचार स्वस्त व उत्तम असल्याने अनेक परदेशी नागरिक उपचारासाठी भारतामध्ये येत असतात.
हेही वाचा… आश्वासनांची पूर्तता झाल्याशिवाय घरे रिकामी करू नका – राज ठाकरे
मात्र भारतातील सर्वसामान्य नागरिकांना हे उपचार परवडणारे नाहीत. त्यामुळे देशातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम व्हावी आणि देशातील उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्यात यावेत यासाठी वैद्यकीय उपकरणे व औषधांवर आकारण्यात येणाऱ्या १८ टक्के वस्तू आणि सेवा कर कमी करून तो तीन ते चार टक्के करावा, अशी मागणी देशातील विविध वैद्यकीय संघटनांनी नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केली आहे. ही मागणी मान्य झाल्यास देशातील औषधे व वैद्यकीय उपकरणांच्या किंमती कमी होतील आणि खासगी रुग्णालयांनाही अल्प दरामध्ये सेवा पुरविणे शक्य हाेईल, असे डॉ. संजय शर्मा म्हणाले. वैद्यकीय संघटनांनी केलेली ही मागणी रास्त आहे. त्यामुळे तिसऱ्या इंडियन कॅन्सर काँग्रसच्या माध्यमातून ही मागणी मंजूर करण्यााठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.