गौतम अदाणींच्या विरोधात सर्वसामान्य जनता आवाज उठवते, तेव्हा मोदाणी सरकार पोलीस यंत्रणेचा वापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करतं. कुर्ल्यातील मदर डेअरीच्या जमिनीच्या लुटीविरोधात लोकशाही मार्गाने निदर्शने करत असताना अदानीचे एजंट असलेल्या भाजपा सरकारने पोलिसांना पुढे करुन आंदोलकांना रोखलं, धक्काबुक्की केली. मुंबईकरांचा आवाज दडपण्याच्या अशा कोणत्याही प्रयत्नांना काँग्रेस भीक घालत नाही. मोदाणी सरकारने कितीही प्रयत्न केले तरी कुर्ल्यातील मदर डेअरीची जमीन अदाणींच्या घशात जाऊ देणार नाही, असा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे वर्षा गायकवाड यांनी?

“अदाणीला मुंबई गिळायची आहे आणि त्यासाठी या अदाणीसाठी सरकारनं वाटेल त्या थराला जाण्याची, लागेल ते करण्याची भूमिका घेतली आहे. यांना ना जनतेची पर्वा आहे ना पर्यावरणाची..! पर्यावरणीय दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील असणारी कुर्ला येथील मदर डेअरीची जागा कसंही करून अदाणींच्या घशात घालण्याचा त्यांचा डाव आहे. पण कुठल्याही परिस्थितीत आम्ही तसं होऊ देणार नाही. धारावी असो, मुलुंड असो, मालाड असो किंवा कुर्ला असो.. अदाणींसाठी या लोकविरोधी सरकारनं वारंवार लोक चळवळी दडपण्याचा आणि मुंबईचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र सत्याचा आणि न्यायाचा आवाज कोणीही दाबू शकत नाही. आजही नाही.. उद्याही नाही..! अदाणी आणि सरकारमध्ये बसलेल्या त्यांच्या दलालांना आम्ही मुंबई लुटू देणार नाही.” अशी पोस्ट वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

माध्यमांशी बोलताना काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?

मुंबईतल्या कुर्ला भागात मदर डेअरीमध्ये बोटॅनिकल गार्डन व्हावे, हा स्थानिक नागरिकांचा प्रस्ताव डावलून अदाणींच्या घशात भूखंड घालण्याचा आरोप करण्यात आला आहे. याचाच निषेध नोंदवत मुंबई काँग्रेसने कुर्ल्यात निषेध मोर्चा काढला होता. हा मोर्चा पोलिसांनी अडवला, यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मदर डेअरीच्या जमिनीवर अनेक वर्षांपासून असलेली शेकडो झाडांची कत्तल करुन हा भूखंड अदानीला दिला जात आहे. मुंबईत प्रदूषण वाढतं आहे आणि दुसरीकडे सरकार अदाणींसाठी शेकडो झाडांची कत्तल करत आहे. या जागेवर गार्डन करावी ही जनतेची मागणी आहे. परंतु केंद्रातील व राज्यातील भाजपाचे सरकार हे अदाणींसाठी काम करत आहे, अशी टीका गायकवाड यांनी केली.

एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि…

वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या, कुर्ल्यातील स्थानिक लोकांच्या भावना मांडत असताना मोठ्या पोलीस फौजफाट्यासह सरकारने दडपशाही केली. लोकप्रतिनिधींनाही बोलू दिले नाही. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि याच लाडक्या बहिणींना भाजपा सरकारच्या पोलिसांनी धक्काबुक्की केली. मुंबईत सेलिब्रिटीपासून सर्वसामान्य मुंबईकर सुरक्षित नाहीत आम्ही त्यांच्या हक्कांसाठी लढत आहोत असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varsha gaikwad congress mp word attack on pm modi and bjp over mother dairy land issue and gautam adani scj