मुंबई: मुंबई महानगरातील सर्वसामान्य प्रवाशांसाठी बेस्टची सेवा खूप महत्त्वाची आहे. परंतु, बेस्ट बसच्या भाड्यात दुप्पटीने वाढ केल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांवर आर्थिक बोजा वाढणार आहे. बेस्टने भाडेवाढ करण्याऐवजी, कारभारात सुधारणा करण्याची गरज आहे. तसेच, मुंबई महापालिकेने भ्रष्टाचार रोखून, बेस्टला एक हजार ते दीड हजार कोटी रुपये निधी द्यावा. तसेच बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी सुरू केलेले खासगीकरण बंद करावे, अशा मागण्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केल्या आहेत.
बेस्ट बसवर ३१ लाखांहून अधिक प्रवासी अवलंबून आहेत. बेस्ट ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. विशेषतः सर्वसामान्य गरीब आणि कामगार वर्गासाठी बेस्ट बस अत्यंत महत्त्वाची आहे. परंतु, ही सार्वजनिक सेवा बळकट करण्याची गरज आहे. उलटपक्षी कंत्राट पद्धती सुरू करून बेस्टचे खासगीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे बेस्टची सेवा सुधारण्याऐवजी रसातळाला जात आहे.
आतापर्यंत सरकारी संस्था तोट्यात दाखवून, त्याच्या प्रत्येक विभागाचा लिलाव करण्यात आला. त्यामुळे बेस्टच्या मोक्याच्या जागा, बेस्टची विद्युतपुरवठा यंत्रणा, परिवहन सेवा मर्जीतील मंडळींच्या घशात घालण्यासाठी ही एक भयानक योजना सुरू आहे, असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला.
काँग्रेसच्या मागण्या
– अयशस्वी खासगीकरणाची पद्धत बंद करणे
– बेस्ट आगाराची विक्री करणे थांबवणे- बेस्टच्या स्वमालकीच्या ताफ्यात वाढ करणे, भाडेतत्त्वावरील बस घेणे बंद करणे- बेस्टचे पुनरुज्जीवन आणि बळकटीकरण करण्यासाठी पालिका आणि राज्य सरकारकडून निधी वाढवा
– परवडणारी सार्वजनिक वाहतूक हा मूलभूत अधिकार आहे. तो चैनीचा नाही.- सार्वजनिक वाहतूक ही एक अत्यावश्यक सेवा आहे. खासगी नफ्यासाठी चालवण्याचा व्यवसाय नाही.
– बेस्टचा विनाश थांबवण्यासाठी आताच कृती करणे आवश्यक आहे.- मेट्रो आणि रस्ते महामार्गावर हजारो कोटी सरकार खर्च करते. तर, शहरातील सर्वसामान्यांना सार्वजनिक बस सेवेसाठी निधी देण्यास तयार का नाही ?