मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांना सर्वप्रथम पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. माजी मंत्री नसिम खांनी यांच्या भेटीनंतर गायकवाड यांनी सोमवारी उत्तर मध्य मुंबईच्या माजी खासदार व काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांची भेट घेऊन, त्यांच्याशी निवडणुकीबाबत चर्चा केली.
काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसिम खान यांनी स्टार प्रचारकाचा राजीनामा देऊन, आपल्याला उमेदवारी नाकारल्याबद्दल नापसंती व्यक्त केली. या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून खान यांचेही नाव चर्चेत होते. परंतु ऐनवेळी वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे त्यांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखविली.
हेही वाचा >>>मुंबई : गोवंडीत मिहीर कोटेचा यांच्या प्रचार फेरीवर दगडफेक
वर्षा गायकवाड यांना भाजपच्या विरोधातील लढाई लढण्याआधी पक्षांतर्गत नाराजी दूर करावी लागत आहे. शनिवारी त्यांनी खान यांची भेट घेऊन, त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यावर राज्यात एकाही मतदारसंघात अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीला उमेदवारी दिली नाही, त्याबद्दल आपण नाराज आहेत, गायकवाड यांना उमेदवारी दिल्याबद्दल नाही, असा त्यांनी नंतर खुलासा केला.
या मतदारसंघाचे २००४ व २००९ असे दोन वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रिया दत्त या अनेक दिवसांपासून नाराज आहेत. या वेळी तर त्यांच्या नावाचा विचारही केला नाही. या मतदारसंघात सुनील दत्त यांच्या माध्यमातून काँग्रेसने कायम वर्चस्व राखले आहे.