मुंबई : काँग्रेस पक्षाच्या ‘मुंबई उत्तर- मध्य’च्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या जाहीरनाम्याचे काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी बुधवारी प्रकाशन केले. गायकवाड यांनी न्यायपत्रात मुंबईकरांवर आश्वासनांची खैरात केली आहे. मुंबई काँग्रेस कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमाला विजय वडेट्टीवार, नसीम खान, बी. एम. संदीप, अमिन पटेल, सचिन सावंत आदी उपस्थित होते.
मुंबईत सर्वांसाठी पाणी, गृहनिर्माण सोसायट्यांचा जीएसटी कमी करणे, विमानतळाशेजारील रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना टीडीआर स्वरूपात वाढीव चटईक्षेत्र देणे, मतदारसंघात हवा प्रदूषण मोजणी यंत्रे, विद्यार्थांना रोबोट प्रयोगशाळा, करिअर कार्यशाळांचे आयोजन, वारसा स्थळांचे जतन करणे, झाडांची कत्तल थांबवणे, तीन महिन्यांतून एकदा नागरिक जनसुनवाई, सल्लामसल करण्यासाठी रहिवासी संघाचा कार्यगट, खेळाच्या मैदानांचे खासगीकरण थांबवणे, खासदारांशी संवादासाठी डिजिटल मंचाची स्थापना, लोकल फेऱ्यांची संख्या वाढवणे आदी शेकडो आश्वासने गायकवाड यांनी आपल्या न्यायपत्रात दिली आहेत.
हेही वाचा >>> बोरीवली कोकण रेल्वेला जोडण्याच्या कामाला मंजुरी – अश्विनी वैष्णव, हार्बर रेल्वे बोरिवलीपर्यंत; लवकरच वंदे भारत सुरू
पंतप्रधान मोदी यांनी दहा वर्षांत काय केले यावर ते बोलत नाहीत. प्रत्येक भाषणात मोदी हे हिंदू, मुस्लीम, पाकिस्तान यावर बोलत असून जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत. परंतु, जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. येत्या ४ जूनला देशातील भाजपचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास काँग्रेसचे राज्य प्रभारी चेन्नीथला यांनी केला. काँग्रेस पक्षाने न्यायपत्रात ५ न्याय आणि २५ हमी दिल्या आहेत. इंडिया आघाडीला जनतेचे १०० टक्के समर्थन मिळत असून मतदानाच्या पाचव्या टप्प्यातही जनतेचे समर्थन कायम राहील, असा दावा प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केला. मुंबईकरांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी या न्यायपत्रात त्रिसूत्री बनवण्यात आली आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.