दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झाल्याने काँग्रेस नेते मिलिंद देवरा हे पक्षाला रामराम करून शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्याप्रमाणे रविवारी (१४ जानेवारी) सकाळी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाबरोबर असलेले ५५ वर्षांचे नाते मी संपवत आहे, अशी पोस्ट मिलिंद देवरा यांनी एक्स या माक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर केली आहे.
एक्सवरील पोस्टमध्ये देवरा यांनी म्हटलं आहे की, “आज मी माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या प्रकरणाचा शेवट करत आहे. मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा देत आहे. काँग्रेसशी माझ्या कुटुंबाचे ५५ वर्षांपासूनचे संबंध आहेत जे मी आज संपवत आहे. इतकी वर्षे मला पाठिंबा दिल्याबद्दल काँग्रेसमधील नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे.”
दरम्यान, मिलिंद देवरा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काँग्रेसकडूनही यावर प्रतिक्रिया आली आहे. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी मिलिंद देवरा यांची एक्सवरील पोस्ट रिपोस्ट करत म्हटलं आहे की, तुम्ही हा निर्णय घेतला हे दुर्दैव आहे. मला वैयक्तिकरित्या हा निर्णय पटला नाही. काँग्रेस कार्यकर्ती म्हणून मला आज खूप वाईट वाटतंय. गेल्या अनेक वर्षांपासून देवरा कुटुंबाचे काँग्रेस परिवाराशी संबंध आहेत. तुम्ही हे पाऊल उचलू नये यासाठी आम्ही सर्वजण तुमची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होतो. पक्ष नेतृत्वानेही तुमच्याशी बातचीत केली होती. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा आज पहिला दिवस आहे. या एतिहासिक दिवशी तुमची ही घोषणा होणं खूप वेदनादायी आहे.
दरम्यान, वर्षा गायकवाड यांनी याविषयी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी आमदार गायकवाड म्हणाल्या, काँग्रेस हे एक कुटुंब आहे. मला वाटतं की, देवरा यांनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा. आम्ही सर्वजण सातत्याने देवरा यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पक्षाचे प्रभारी आणि मी स्वतःदेखील त्यांच्याशी बातचीत केली. सर्वांना एकत्र ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु, ते त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत.
हे ही वाचा >> “छगन भुजबळांचे लाड पुरवणाऱ्यांना…”, मनोज जरांगेंचा इशारा; म्हणाले, “त्यांनी महापुरुषांच्या जाती…”
मिलिंद देवरा काँग्रेसच्या तिकीटावर २००४ आणि २००९ साली दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. तसेच त्यांचे वडील मुरली देवरा हे चार वेळा दक्षिण मुंबईतून खासदार झाले होते. त्यामुळे मुंबईच्या आणि दिल्लीच्या राजकारणात देवरा कुटुंबाचं वजन आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या शिंदे गटाचा दिल्लीत कोणीही प्रसिद्ध चेहरा नाही. मिलिंद देवरा यांचे दिल्ली वर्तुळातील संबंध लक्षात घेता शिंदे गटही देवरा यांना आपल्या पक्षात घेण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे.