पावसाने दमदार हजेरी लावूनही वसई-विरार महापालिका निवडणुकीत सुमारे ४९ टक्के मतदान झाले आहे. काही ठिकाणी तणावपूर्ण वातावरण असले तरी मतदान शांततेत पार पडले. कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे आयोगातील सूत्रांनी सांगितले. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप-शिवसेनेने आव्हान दिले आहे. निवडणुकीचा निकाल १६ जूनला जाहीर होणार आहे.
महापालिकेतील १११ प्रभागांमधून निवडून येण्यासाठी ३६७ उमेदवार या निवडणुकीत आले नशीब अजमावत आहेत. मुसळधार पावसाचा मतदानाला काही प्रमाणात फटका बसला. पावसामुळे विरार गावठाण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत वीजपुरवठा बंद पडला. त्यामुळे मतदारांची गैरसोय झाली. पण मेणबत्तीच्या प्रकाशात मतदानाची प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली.  बहुजन विकास आघाडीसह राजकीय पक्षांचे कार्यकर्ते अनेक मतदान केंद्रांना भेटी देत होते. त्यामुळे विरार येथे थोडासा तणाव होता. किरकोळ वाद व बाचाबाचीचे प्रकार झाले, तरीही त्याचा कोणताही परिणाम मतदानावर झाला नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

Story img Loader