विविध अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी विस्तारीत मान्यता मिळविताना शीवच्या ‘वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालया’ने पायाभूत आणि शैक्षणिक सुविधांबाबत खोटी माहिती दाखवून ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद’ (एआयसीटीई) या केंद्रीय शिखर परिषदेची दिशाभूल केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
अनधिकृत मजल्यांवर पदविका अभ्यासक्रम चालविणे, विद्यार्थ्यांकडून जादा शुल्कवसुली करणे आदी अनेक कारणांमुळे गेले काही दिवस हे महाविद्यालय चर्चेत आहे. आता प्रत्यक्षात नसलेल्या पायाभूत व शैक्षणिक सुविधा दाखवून महाविद्यालय एआयसीटीईच्याही डोळ्यात धूळ फेकत असल्याचे माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीत स्पष्ट झाले आहे. शिक्षकांची संख्या पुरेशी आहे हे दाखविण्यासाठी राजीनामा दिलेल्या वा निवृत्त झालेल्या तब्बल १० प्राध्यापकांची नावे आपल्या अध्यापक वर्गाच्या यादीत दाखवून महाविद्यालयाने एआयसीटीईची फसवणूक केली आहे.
प्रत्येक अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला दरवर्षी एआयसीटीईकडून मान्यता मिळवावी लागते. त्यासाठी संस्थेला आपल्या महाविद्यालयात असलेल्या पायाभूत व शैक्षणिक सुविधांची माहिती परिषदेला पुरवावी लागते. या निकषांबाबत एआयसीटीई फार काटेकोर असते. त्यामुळे, दरवर्षी संबंधित अभ्यासक्रमासाठी नेमून दिलेल्या निकषांची पूर्तता महाविद्यालयाने केली आहे का हे तपासल्यानंतरच एआयसीटीई मान्यता कायम ठेवावी की नाही याचा निर्णय घेते. त्याप्रमाणे २०१२-१३ या शैक्षणिक वर्षांसाठी पद्मभूषण वसंतदादा पाटील प्रतिष्ठान चलित वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने एआयसीटीईला माहिती सादर केली. पण, यापैकी बहुतांश माहिती खोटी दाखवून एआयसीटीईची दिशाभूल केल्याचे माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीत स्पष्ट झाले आहे.
एकही सेमिनार हॉल नसताना सहा हॉल असल्याचा दावा महाविद्यालयाने केला आहे. महाविद्यालयाकडे एकही संशोधन प्रयोगशाळा नसूनही दोन प्रयोगशाळा असल्याचा दावा करण्यात आला आहे. एआयसीटीईला दाखविण्यात आलेले मुख्याध्यापकाचे निवासस्थान, सहा टय़ुटोरिअल रूम, मुलांसाठी कॉमन रूम, प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र कार्यालय, मुलींचे वसतिगृह प्रत्यक्षात महाविद्यालयात नाही, असा आरोप माजी सिनेट सदस्य सुभाष आठवले यांनी केला. प्रा. आठवले यांनी हा प्रकार एआयसीटीईच्या लक्षात आणून दिला आहे. त्याचबरोबर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्याकडेही आठवले यांनी मंगळवारी या प्रकाराची तक्रार केली.
संस्थेवर ताबा मिळविण्याचे प्रयत्न
या संदर्भात संस्थेचे संचालक व्ही. टी. धुरी यांच्याशी संपर्क साधला असता आठवले यांच्या आरोपात तथ्य नसल्याचा खुलासा केला. संस्था ताब्यात घेण्यासाठी काहीजण प्रयत्नशील आहेत. याच व्यक्ती माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नाव पुढे करून संस्थेविरोधात कटकारस्थान करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा