माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक हे दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांनी महाराष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर नेलेच, पण देशपातळीवरही भरीव कामगिरी केली, असे गौरवोद्गार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी येथे काढले. वसंतराव नाईक जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्ताने ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’मध्ये झालेल्या समारंभास राष्ट्रपती मुखर्जी उपस्थित होते. राज्यपाल के. शंकरनारायण अध्यक्षस्थानी होते. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, गृहमंत्री सुशीलकुमार िशदे, प्रफुल्ल पटेल, तारिक अन्वर, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, विधानपरिषद सभापती शिवाजीराव देशमुख, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
नाईक यांनी मुख्यमंत्रीपदाच्या ११ वर्षांच्या काळात आणि देशपातळीवरही केलेल्या कामगिरीचा आढावा राष्ट्रपती मुखर्जी यांनी आपल्या भाषणात घेतला. राज्यात १९७२ साली पडलेल्या भीषण दुष्काळाला त्यांनी समर्थपणे तोंड दिले. राज्याला स्थैर्य दिले. रोजगार हमी योजना महाराष्ट्रात सुरू केली आणि आता ती देशपातळीवरही सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना आर्थिक मदत देताना गाडगीळ समितीने निश्चित केलेल्या सूत्रांचा आधार घेतला जातो. पण काही वेळा राज्यांचे प्रश्न वेगळे असतात. त्यामुळे मदतीचे धोरण हे लवचिक असले पाहिजे, अशी सूचना नाईक यांनी केली होती, असे मुखर्जी यांनी सांगितले.
नाईक यांची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती देऊन मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, परभणी कृषी विद्यापीठाला वसंतराव नाईक यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांचे जन्मगाव गहुली येथे दोन कोटी रुपये तर पुसदला सहा कोटी रुपये खर्च करून स्मारक उभारले जाईल. त्यांचे शिक्षण झालेल्या नागपूरमधील मॉरिस महाविद्यालयात १७५० आसनक्षमतेचे सभागृह उभारले जाईल. त्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र व राज्य सरकारतर्फे राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नागपूर येथे केले जाणार आहे.
दरम्यान, भटक्या, विमुक्तांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना नाईक यांच्या नावाने समाजभूषण पुरस्कार सुरू करण्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी केली. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा