मुंबई : रोजच्या जगण्याशी निगडित आणि मानवी भावनांचा वेध घेणारे विषय, सादरीकरणातील नावीन्य, प्रेक्षकांची दाद, यांसह ‘लोकसत्ता लोकांकिका’ची मुंबईची विभागीय अंतिम फेरी रंगली. मुंबई विभागीय अंतिम फेरीत विनायक गणेश वझे महाविद्यालयाच्या ‘एकूण पट- १’ या एकांकिकेने बाजी मारून महाअंतिम फेरी गाठली आहे.
सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’ची मुंबई विभागीय अंतिम फेरी शनिवारी यशवंत नाटय़ मंदिर येथे मोठय़ा उत्साहात पार पडली. निरनिराळय़ा विषयांवर सादर होणाऱ्या एकांकिका आणि विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली. मुंबई विभागीय अंतिम फेरीत गुरुनानक खालसा महाविद्यालयाच्या ‘लोकल पार्लर’ या एकांकिकेने दुसरा क्रमांक, तर के. सी. श्रॉफ महाविद्यालयाच्या ‘अलाऊ मी’ या एकांकिकेने तिसरा क्रमांक पटकावला. दिग्दर्शन, लेखन, अभिनय, नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना यांसाठीच्या वैयक्तिक पारितोषिकांवरही ‘एकूण पट- १’ मधील कलाकारांचा वरचष्मा राहिला.
हेही वाचा >>> इंग्रजीचा प्रभाव वाढल्यामुळे नवनिर्मितीचा विचार खुंटला; ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचे मत
मुंबई अंतिम फेरीत कीर्ती महाविद्यालयाची ‘सुमित्रा’, भवन्स अंधेरी महाविद्यालयाची ‘टोपरं’, सिडनहॅम महाविद्यालयाची ‘उंदीर मामा आयलो’ या एकांकिकाही सादर करण्यात आल्या होत्या. प्रत्येक प्रसंग प्रभावीपणे जिवंत करणारी प्रकाशयोजना, कथेला साजेसे नेपथ्य, मनाचा ठाव घेणारे संगीत, लक्षवेधी वेशभूषा आणि रंगभूषा यांनी प्रेक्षकांना शेवटपर्यंत एकांकिकेशी बांधून ठेवले होते.
मुंबई विभागीय अंतिम फेरीचे परीक्षण लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख आणि दिग्दर्शक देवेंद्र पेम यांनी केले. परीक्षकांसह ‘सॉफ्ट कॉर्नर’चे दिलीप कुलकर्णी, ‘केसरी टूर्स’च्या सुनीता पाटील, नाटय़निर्माते दिलीप जाधव, अभिनेता संदीप पाठक, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. नाटककार प्रेमानंद गज्वी, अभिनेते संजय क्षेमकल्याणी, पृथ्वीक प्रताप, दिग्दर्शक रमेश दिघे, रणजीत पाटील, रंगकर्मी नीलकंठ कदम, सुनील देवळेकर, अभिनेत्री स्नेहल शिदम स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यास उपस्थित होते.
आता लक्ष महाअंतिम फेरीकडे
राज्यभरातील महाविद्यालयीन तरुणाईला एकांकिका स्पर्धेच्या मंचावर एकत्र आणणारी ‘लोकसत्ता लोकांकिका’ आता अंतिम टप्प्यावर पोहोचली आहे. आठ विभागांतील प्राथमिक आणि विभागीय अंतिम फेरी पूर्ण होत आल्या आहेत. शनिवार, १६ डिसेंबर रोजी माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ महाअंतिम सोहळय़ासाठी प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते, लेखक सौरभ शुक्ला हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
‘मनुष्य’चे सादरीकरण
‘लोकसत्ता लोकांकिका’च्या महाअंतिम सोहळय़ासाठी येणारे विद्यार्थी आणि रंगकर्मीसमोर हिंदी चित्रपटसृष्टीतील चतुरस्र अभिनेते, नाटककार, दिग्दर्शक मकरंद देशपांडे यांच्या ‘मनुष्य’ या नव्या नाटकाच्या संपादित अंशाचे खास सादरीकरण केले जाणार आहे. महाअंतिम सोहळय़ाचे हे एक विशेष आकर्षण असेल.
मुंबई विभागीय अंतिम फेरीचा निकाल
* सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम : ‘एकूण पट – १’ – विनायक गणेश वझे स्वायत्त महाविद्यालय, मुलुंड
* सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय : ‘लोकल पार्लर’ – गुरुनानक खालसा स्वायत्त महाविद्यालय, माटुंगा
* सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय : ‘अलाऊ मी’ – के. ई. एस. श्रॉफ महाविद्यालय, कांदिवली
* विशेष परीक्षक सन्मान एकांकिका : ‘सुमित्रा’ – कीर्ती एम. डुंगरसी महाविद्यालय, दादर
* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : अमित पाटील / सिद्धेश साळवी (एकूण पट – १)
* सर्वोत्कृष्ट लेखक : सिद्धेश साळवी (एकूण पट – १)
* सर्वोत्कृष्ट अभिनय : साकार देसाई (लोकल पार्लर), तेजस्वी ओकटे (टोपरं), मनस्वी लगाडे (एकूण पट – १), राहुल पेडणेकर (एकूण पट – १)
* सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार : अद्वैत, अमित आणि प्रथमेश (एकूण पट – १)
* सर्वोत्कृष्ट संगीत : वृषभ करंगुटकर आणि प्रणव चांदोरकर (एकूण पट – १)
* सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना : सिद्धेश नांदलस्कर (एकूण पट – १)
‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेच्या माध्यमातून दरवर्षी नावीन्यपूर्ण विषय विद्यार्थी मांडत असतात. कधी कधी आपल्या मनात अडलेल्या गोष्टींचे उत्तर एकांकिकेमध्ये सापडून जाते. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे व्यासपीठ असून ही स्पर्धा अविरतपणे सुरू राहावी.- प्राजक्त देशमुख, लेखक, दिग्दर्शक
आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धाच्या क्षेत्रात महाराष्ट्रातून पहिले येण्याचा मान ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेतून मिळतो. वैविध्यपूर्ण विषय मुंबईतील महाविद्यालयांनी हाताळले होते. एकांकिकेसाठी संकल्पना सुचणे अतिशय महत्त्वाचे असते. पण एकांकिकेच्या विषयाची उकल परिणामकारकरीत्या सादर केली, तर एकांकिका जास्त प्रभावी होईल. – देवेंद्र पेम, दिग्दर्शक