वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलनातील नेते मनोज जरांगे पाटील यांना एक सल्ला दिला आहे. हा सल्ला देताना त्यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष व खासदार सोनिया गांधी यांच्याही नावाचा उल्लेख केला. तसेच एक उदाहारण देत मनोज जरांगेंना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला. ते शनिवारी (२५ नोव्हेंबर) मुंबईत आयोजित संविधान सन्मान महासभेत बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “काँग्रेसच्या सल्लागाराने सोनिया गांधींना गुजरातमध्ये एक शब्द वापरायला सांगितला आणि त्याचा हिंदीत अनुवाद ‘मौत का सौदागर’ असा झाला. सोनिया गांधींनी सल्लागारांनी सांगितलेलं वाक्य वापरलं. ते मोदींच्या विरोधातील वाक्य होतं. कारण गुजरातमध्ये २००४ ला नरसंहार झाला होता. त्या एका वाक्याने २००९ मध्ये काँग्रेसचं येणारं सरकार गेलं.”
“सोनिया गांधींनी चूक केली, मनोज जरांगेंनी ती चूक…”
“माझा मनोज जरांगे पाटील यांनाही तोच सल्ला आहे. सोनिया गांधींनी चूक केली, मनोज जरांगेंनी ती चूक करू नये. सल्लागाराचं अजिबात ऐकू नका,” असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगेंना दिला.
“३ डिसेंबरनंतर देशात कुठे ना कुठे नरसंहार…”
या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थेट उल्लेख न करता जोरदार टीका केली. ते म्हणाले, “सध्यात देशात आरक्षणाच्या नावाने समाजा-समाजाला एकमेकांच्या विरोधात लढवलं जातं आहे, अशी परिस्थिती आहे. हे थांबवण्याऐवजी खतपाणी घातलं जातं आहे. २००२ मध्ये गोधरा हत्याकांड घडलं, २०२३ मध्ये मणिपूरमध्ये नरसंहार झाला. कदाचित ३ डिसेंबरनंतर देशातील कुठल्या ना कुठल्या भागात नरसंहार घडण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्या.”
“आधी तुमचा मुलगा पुढे करा मग आम्ही पाठीमागे येतो”
“जनतेला माझं आवाहन आहे की, देशात भडकवणाऱ्या संघटना बऱ्याच आहेत. जे भडकवणारे नेते आहेत, त्यांना म्हणा… आधी तुमचा मुलगा पुढे करा मग आम्ही पाठीमागे येतो. स्वत:चं कुटुंब सुरक्षित ठेवायचं आणि लोकांना पुढे करायचं. स्वत:ला इजा होऊ द्यायच्या नाहीत, पण दुसऱ्याला इजा होऊ द्यायच्या, अशा भूमिकेपासून आपण सावध राहायला हवं,” असंही प्रकाश आंबेडकरांनी नमूद केलं.