मुंबईवर २६/११ रोजी भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर दहशतवादी अजमल कसाब याला फाशीची शिक्षा देण्यात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता भाजपाने त्यांनी मुंबई उत्तर मध्य लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे. त्यानंतर या खटल्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही याबाबत प्रश्न विचारले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन उज्ज्वल निकम यांना काही प्रश्न विचारले आहेत. ते म्हणाले, हेमंत करकरे आणि साळसकर यांच्या शरीरात मिळालेल्या गोळ्या जर कसाब आणि अबू इस्माईल यांच्या बंदुकीतील नव्हत्या तर त्या कुणाच्या बंदुकीतील होत्या? वरिष्ठ वकील म्हणून हा प्रश्न उज्ज्वल निकम यांना पडलाच पाहिजे होता, असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी निकम यांना विचारला आहे.

‘करकरेंच्या शरीरात नेमक्या कुणाच्या गोळ्या?’ Who Killed Karkare पुस्तकाचे लेखक एसएम मुश्रीफ म्हणाले…

आंबेडकर यांनी पुढे म्हटले की, उज्ज्वल निकम यांना माझे दोन प्रश्न आहेत. निवडणुकीच्या आधी त्यांनी याचे उत्तर द्यावे. मुंबईवर झालेला हल्ला हा पाकिस्तान पुरस्कृत होता, याबाबत दुमत नाही. पण या घटनेच्या आड कुणीतरी दुसरी घटना घडवून आणली का? याचा खुलासा निकम यांनी केला पाहीजे. इतर पोलीस अधिकाऱ्यांना लागलेल्या गोळ्या आणि करकरे-साळसकर यांच्या शरीरात मिळालेल्या गोळ्या सारख्या नाहीत. मग या गोळ्या कोणत्या शस्त्रातील होत्या? याबाबत त्यांनी अतिरिक्त चौकशीची मागणी का केली नाही आणि न्यायालयाला ही बाब त्यांनी नजरेस का आणून दिली नाही? याचा खुलासा निकम यांनी करावा, असे आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे.

हेमंत करकरेंच्या मृत्यूप्रकरणी विजय वडेट्टीवारांच्या आरोपांवर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “पाकिस्तान सरकारला…”

आताच हे प्रश्न का उपस्थित केले?

२६/११ च्या घटनेला आणि त्या निकालाला इतके वर्ष उलटल्यानंतर आता हा प्रश्न का उपस्थित करत आहात? असा एक प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले की, ही घटना घडली तेव्हा आमचे आमदार किंवा खासदार विधीमंडळ किंवा संसदेत नव्हते. नाहीतर आम्ही त्यावेळी हा प्रश्न उपस्थित केला असता. मात्र आता उज्ज्वल निकम उमेदवार आहेत. त्यांचा विजय झाला तर ते संसदेत जातील. संसदेत प्रामाणिक लोक गेले पाहीजेत, अशी आमची भूमिका आहे. म्हणून आम्ही निकम यांचा खुलासा मागत आहोत.