काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी (१७ ऑगस्ट) “वंचित बहुजन आघाडीचा समावेश ‘इंडिया’ आघाडीत व्हावा, अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे,” असं वक्तव्य केलं. यानंतर आता वंचित बहुजन आघाडीला देश पातळीवरील ‘इंडिया’ आघाडीत आणि राज्यातील महाविकास आघाडीत येण्यापासून कोण रोखत आहे? असा सवाल वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी अशोक चव्हाण यांना केला.
सोमनाथ साळुंखे म्हणाले, “अशोक चव्हाण यांनी लक्षात घ्यावं की, वंचित बहुजन आघाडी व ‘इंडिया’ची युती होऊ शकते आणि वंचित मविआमध्ये महत्त्वाचा व व्यवहार्य घटक होऊ शकतो. आकडेवारी खोटं बोलत नाही. आम्ही वारंवार वंचित बहुजन आघाडीचे दरवाजे ‘इंडिया’ व महाविकास आघाडीसाठी खुले आहेत हे सांगत आहोत.”
“वंचितला ‘इंडिया’ व मविआमध्ये सहभागी करण्यापासून काँग्रेसला कोण थांबवत आहे?”
“‘इंडिया’ आघाडी आणि मविआला येणाऱ्या लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपला खरंच प्रामाणिकपणे पराभूत करायचे असेल, तर काँग्रेसला बाळासाहेब आंबेडकरांना ‘इंडिया’ व महाविकास आघाडीमध्ये सहभागी करून घेण्यापासून कोण थांबवत आहे? वंचित बहुजन आघाडीचे दरवाजे भाजपविरोधी सर्व पक्ष आणि जन संघटनांसाठी कायमच खुले आहेत,” असं मत वंचितने व्यक्त केलं.
व्हिडीओ पाहा :
“सक्षम विरोधी पक्ष वंचित आणि बहुजनांच्या सहभागाशिवाय अपुरा”
साळुंखे पुढे म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये निर्णायक ताकद असताना वंचित बहुजनांच्या अस्तित्वाला नाकारून आरएसएस-भाजपाच्या विषमतावादी ताकदीशी ‘इंडिया’ व महाविकास आघाडी कशी लढणार आहे? हा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित राहतोय. भाजपाविरोधी संघर्षासाठी सक्षम विरोधी पक्ष वंचित आणि बहुजनांच्या सहभागाशिवाय अपुरा आहे. भाजपा-आरएसएसशी लढण्यासाठी वंचितांची ताकद आवश्यक आहे.”
हेही वाचा : “गौतम अदाणींसाठी मणिपूरमध्ये…”, प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर खळबळजनक आरोप
“देशभरातील अनेक राज्यात दलित, आदिवासी, ओबीसी मतांवर ‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकर यांची पकड आहे. असं असताना त्यांचा ‘इंडिया’ आघाडीत समावेश का केला जात नसेल? अशी शंका यानिमित्ताने उपस्थित राहतेय,” असंही साळुंखे यांनी म्हटलं.
अशोक चव्हाण काय म्हणाले होते?
वंचित बहुजन आघाडीचा समावेश ‘इंडिया’ आघाडीत व्हावा, अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. त्याचा फायदा INDIA आघाडीलाच होईल. ‘वंचित’ला समावेश करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल.