जेष्ठ रंगकर्मी जनार्दन परब यांचे आज सकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा दिग्दर्शक सर्वेश परब, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. आज दुपारी जोगेश्वरी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
जनार्दन परब यांनी चार दशकाहून अधिक काळ रंगभूमी व रुपेरी पडद्यासाठी स्वत:ला झोकून दिलं होत. अनेक हिंदी-मराठी चित्रपटात जनार्दन यांनी केलेल्या लहान मोठ्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.  यामध्ये “माझा पती करोडपती”, “नवरी मिळे नवर्‍याला”, “गम्मत जम्मत”, “कुलस्वामिनी तुळजाभवानी” चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलं असून, हिंदीत “कसम”, “शिकारी”, “ऐलान”, “जिद्दी”, “क्रांतीवीर”, “बाजीगर”, “नायक”, “गुलाम”, “उडान”, “चायना गेट” सारख्या असंख्य चित्रपटांत त्यांनी काम केले आहे.  त्यांच्या प्रमुख नाटकांमध्ये “अवध्य”, “नटकीच्या लग्नाला”, “अजब न्याय वर्तुळाचा”, “हमिदाबाईची कोठी”, “रात्र थोडी सोंग फार”, “काका किशाचा”, “संगीत विद्याहरण”, “मुद्र राक्षस” समावेश असून त्यांनी “धुमशान”, “नशिबवान धाव खावचो”, “कबूतरखाना” सारख्या मालवणी नाटकांमध्ये अभिनयासोबतच दिग्दर्शन देखील केले. प्रख्यात मालवणी अभिनेते मच्छिंद्र कांबळी यांच्यानंतर मालवणी नाटके आणि मालवणी रंगभूमीचा प्रवास पुढे अविरत सुरू ठेवण्यासाठी जनार्दन परब यांनी प्रयत्न केलेले. नाना पाटेकर यांच्या बरोबर त्यांनी क्रांतिवीर चित्रपटामध्ये काम केले होते.
जनार्दन यांच्या कार्याची दखल घेत त्यांना “शंकर घाणेकर पुरस्कार”, २००८ सालचा “नटवर्य केशवराव दाते पुरस्कार” तसंच “कॉलेज साहित्य पुरस्कारानं” सन्मानित करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veataran marathi actor janardhan parab passed away
Show comments