‘वेदान्त-फॉक्सकॉन’यांच्या भागीदारीतून उभा राहणारा प्रकल्प गुजरातला गेला आहे. यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका सुरू झाली आहे. तर, विरोधकांच्या टीकेला सत्ताधाऱ्यांकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर आज(शुक्रवार) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विरोधकांवर निशाणा साधला आहे. मुंबईत लघु उद्योग भारतीच्या प्रदेश अधिवेशनात ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी सांगू इच्छितो तुमच्या(विरोधकांच्या) काळात महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेला असेल, पुढील दोन वर्षांत महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेलं नाही तर बघा, निश्चतपणे नेणार. ही चांगली स्पर्धा आहे, गुजरात काय पाकिस्तान थोडीच आहे. आपला लहान भाऊच आहे. आपण एकत्रच होतो, एकाच दिवशी दोन राज्य झालो आहोत. पण शेवटी ही एक चांगली स्पर्धा आहे. आम्हाला गुजरातच्या पुढे जायचं आहे. कर्नाटकाच्या पुढे जायचं आहे आणि सगळ्यांच्या पुढे जायचं आहे. महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरच राहिला पाहिजे, तो दुसऱ्या स्थानावर आम्ही ठेवूच शकत नाही आणि ते आम्ही करून दाखवू.”
याचबरोबर, “गुजरातमध्ये जाण्याचा त्यांचा निर्णय आमचं सरकार येण्याच्या अगोदर झालेला होता. आम्ही सत्तेत आल्यानंतर तो प्रकल्प आपल्या राज्यात यावा यासाठी निकराचा प्रयत्न केला. मात्र ज्यांनी काहीच केलं नाही, ते आता आमच्याकडे बोट दाखवतायत, ते आम्हाला शहापण शिकवतायत. अरे तुमचं कर्तृत्व काय ते तरी सांगा. तुम्ही काय केलं हे तरी सांगा. मूळात काही केलंच नाही आणि आम्हाला शहाणपण सांगताय.” असं म्हणत यावेळी फडणवीसांनी राज्य सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांना प्रत्युत्तर दिलं.
गुजरातपेक्षा जास्त आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत, असंही सांगितलं होतं –
“वेदान्ता-फॉक्सकॉनचे प्रमुख अनिल अग्रवाल यांनी ट्वीट करून सर्व वस्तूस्थिती मांडली आहे. पण तरी आमच्याकडे काही लोक आणि मी सगळे पत्रकार म्हणणार नाही, परंतु तीन पत्रकार आहेत, जे त्यांच्या संस्थेसाठी काम नाही करत. राजकीय नेत्यांसाठी काम करतात आणि तेच कथा तयार करत आहेत. खरं म्हणजे ज्या दिवशी मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, दुसऱ्या दिवशी मी एमआयडीसीच्या सीईओना बोलावल आणि काय सुरू आहे याची विचारणा केली. त्यांनी असं सांगितलं की, वेदान्ताचा कल गुजरातच्या दिशेने चालला आहे आपण घाई केली पाहिजे. त्यानंतर मी तत्काळ मुख्यमंत्र्यांशी बोललो आणि अनिल अग्रवाल यांच्याशी माझे स्वत:चे वैयक्तिक संबंध आहेत. मी त्यांना म्हणालो तुम्ही जे गुजरात देतय त्यापेक्षा जास्त आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. मग मुख्यमंत्री देखील बोलले तसं पत्र त्यांना लिहिलं, मी स्वत: त्यांच्या घरी गेलो. त्यावेळी त्यांनी एकच सांगितलं की आम्ही पुढच्या टप्प्यात गेलो आहोत, गुजरातमध्ये निर्णयाच्या जवळ पोहचलो आहोत. आता आम्हाला परत येणं थोडं कठीण आहे. परंतु मी तुम्हाला एवढं आश्वासित करतो की, आम्ही महाराष्ट्रात निश्चितपणे गुंतवणूक करू. त्यानंतर त्यांनी गुजरातसोबत करार केला. ” अशी यावेळी फडणवीसांनी सविस्तर माहिती दिली.
पाहा व्हिडीओ –
उपमुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधत म्हटले की, “माझा सवाल आहे की या महाराष्ट्रात ३ लाख ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन, राज्यात देशातील सगळ्यात मोठी रिफायनरी येणार होती. ३ लाख ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक म्हणजे देशाच्या इतिहासातील सगळ्यात मोठी गुंतवणूक होती. करणार कोण होतं, तर सगळ्या शासकीय ऑईल कंपनी आणि त्यांच्यासोबत भागीदार म्हणून मध्य पूर्वेकडील कंपनी. या एका गुंतवणुकीने पाच लाख लोकांना आपण रोजगार देऊ शकलो असतो. त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर गुजरातच्या अर्थव्यवस्थेला बघितलं. तर गुजरातच्या अर्थव्यवस्थेत दोनच गोष्टींचा वाटा आहे. पहिला वाटा आहे तो जामनगरच्या रिफायनरीचा आणि दुसरा वाटा आहे तो मुंद्रा पोर्टचा. या जामनगरच्या रिफायनरीपेक्षा तीन-चारपट मोठी रिफायनरी जर महाराष्ट्रात तयार झाली असती, तर महाराष्ट्र इतर कोणत्याही राज्यांपेक्षा थेट दहा वर्षे पुढे गेला असता. परंतु दुर्दैवाने त्या रिफायनरीला विरोध झाला. ती होऊ दिली नाही. आजही आम्ही ती करणार आहोत, परंतु आज अडचण अशी आहे की आता ती साडेतीन लाख कोटींची राहणार नाही. कारण, सरकार विविध पर्याय बघत असतं. जर तीन-चार वर्षांचा काळ निघून गेला, तर मग दोन-तीन ठिकाणी रिफायनरी होतात. त्यामुळे इतकी मोठी आपली गुंतवणूक ही आपण घालवली.”
गुंतवणूकदार राज्यातील वातावरण बघत असतो –
तर, “गुंतवणूकदार राज्यातील वातावरण कसं आहे हे बघत असतो. आज सगळ्यात जास्त रोजगार निर्मिती ही पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमधून होत असते, मात्र आपल्याकडे बुलेट ट्रेन, मेट्रो बंद करण्यात आली. २० लाख कोटींची गुंतवणूक असलेली मेट्रो 3 होऊ दिली नाही. आज मुंद्र पोर्ट पेक्षा आणि जगातील सर्वात चांगला पोर्ट आम्ही महाराष्ट्रात वाढवण येथे करून इच्छितो. वाढवणच्या बंदरावर जगातील कुठलंही जहाज येऊ शकतं. काल रशियात मी एक व्यापारी बैठक घेतली त्यात सर्वांची तक्रार हीच होती की जेएनपीटीवर जागाच पुरत नाही.” असं यावेळी फडणवीसांनी बोलू दाखवलं.
सगळ्या गोष्टींना विरोध आणि गुंतवणूक आली पाहिजे अशी अपेक्षा –
“आमचं(विरोधकांचं) धोरण एकच सगळं बंद करणार आणि मग सगळं बंद करणार तर मग गुजराच्या पुढे जाणार कसं?. तिथे सगळंच सुरू आहे. मुंद्रा पोर्टही सुरू आहे, रिफायनरी देखील सुरू आहे. सगळ्या गोष्टींना विरोध केला जातो आणि आपल्याकडे गुंतवणूक आली पाहिजे अशी अपेक्षा केली जाते, अशी गुंतवणूक येत नाही. मागील दोन वर्षात सर्वांना अनुभव आला असेल की जाहीर केलेली प्रत्येक सबसिडी मिळवण्यासाठी दहा टक्के रक्कम द्यावी लागायची. म्हणजे भ्रष्टाचार तरी किती असावा?” असा सवालही यावेळी फडणवीसांनी उपस्थित केला.