राणीची बाग अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आज पेंग्विनच्या तीन पिल्लांचं बारसं करण्यात आलं. कोको, स्टेला आणि जेरी अशी नावं या तिघांना ठेवण्यात आली आहेत. तसंच वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचा १६१ वा वर्धापन दिन सोहळाही झाला. प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी आणि उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
पेंग्विनच्या पिल्लांची नावं आणि त्यांचे आई वडील कोण?
हम्बोल्ट पेंग्विन कक्षातील तीन नवीन पिल्लांच्या नामकरण सोहळा पार पडला त्यांची कोको स्टेला व जेरी अशी नावे ठेवण्यात आली.
१) कोको (मादी) २७/०४/२०२३ पालक: मोल्ट व फ्लिपर
२) स्टेला (मादी) २३/०५/२०२३ पालक: पोपॉय व ऑलिव्ह
३) जेरी (नर) २७/०६/ २०२३ पालक: डोनाल्ड व डेझी
१६१ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयातील विविध वनस्पतींच्या तसेच वाळवंटात आढळणाऱ्या विविध प्रजातीच्या झाडाझुडपांच्या प्रदर्शनाचे उदघाट्न करण्यात आले.
‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेने प्लास्टिक पासून तयार केलेले १५ बेंचेस (आसन व्यवस्था) प्राणिसंग्रहालयास भेट देण्यात आले व प्राणिसंग्रहालयात वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटकांच्या सुविधेसाठी बसवण्यात आले.
पर्यटकांच्या सुविधेसाठी मनराव चॅरिटेबल ट्रस्ट चा वतीने प्राणिसंग्रहालयास मिळालेल्या ५ व्हीलचेअर्स देखील आज हस्तांतरित करण्यात आल्या. त्याचप्रमाणे मुंबई प्राणिसंग्रहालयातील गांडूळ खत प्रकल्पावर काम करणाऱ्या माळी कर्मचाऱ्यांनी केलेल्या गांडूळ खत विक्रीच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
मुंबई प्राणिसंग्रहालयामध्ये जगाच्या एकूण सात खंडांपैकी सहा खंडातील वृक्ष वनस्पती आहेत त्या वनस्पतींवर आधारित नवीन मालिका सिल्वन फॉरेस्ट याच्या प्रोमो व्हिडिओ चे अनावरण करण्यात आले.त्याचप्रमाणे वर्धापन दिनाचे औचित्य साधून युनिकेअर हेल्थ सेंटर यांच्यावतीने सर्व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.