बाजार समिती बंदच्या नावाखाली ग्राहकांची लूट; व्यापाऱ्यांबरोबर उद्या चर्चा
कमी आवक आणि बाजार समितीच्या बंदमुळे भाज्यांच्या दराने शंभरी पार केली आहे. बाजार समितीने बंद पुकारल्याने घाऊक व्यापार बंद होऊन किरकोळ विक्रेत्यांकडील भाज्यांची आवक रोडावली. यामुळे बहुतेक भाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवलीसारख्या उपनगरांतील किरकोळ मंडयांमध्ये गवार, भेंडी, फरसबी, टॉमेटो, वांगी, ढोबळी मिरची आदी प्रमुख भाज्या किलोमागे १०० ते १५० रुपये दराने विकल्या जात आहेत.
बाजार समित्यांच्या बंदमुळे पुणे, नाशिक जिल्ह्य़ांतून नवी मुंबईच्या घाऊक बाजारात होणारी भाज्यांची आवक पूर्णपणे ठप्प झाली. किरकोळ बाजारात उत्तम प्रतीचा टोमॅटो किलोमागे १०० रुपयांनी विकला जात असल्याचे किरकोळ भाजी विक्रते रवी कुर्डेकर यांनी सांगितले. उन्हाळ्यात राज्यात दुष्काळाच्या झळा जाणवत होत्या. त्यामुळे मुंबईकरांची भाजी महागली, असे कारण पुढे केले जात होते. पावसाळा सुरू झाल्यावर हे चित्र बदलेल, असे सांगितले जात असतानाच भाज्यांचे दर आणखी वाढले आहेत. उलट, राज्य शासन आणि व्यापारी यांच्यातील संघर्षांमुळे भाज्या महाग होऊन त्याचा सर्वसामान्यांना फटका बसला आहे.
प्रमुख भाजी मंडयांमध्ये कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, भेंडी, गवार, फरसबी, वांगी, मिरची या प्रमुख भाज्या १००, १२० आणि १५० रुपये किलो अशा विकल्या जाऊ लागल्याने या भाज्या सर्वसामान्यांच्या ताटातून गायब होऊ लागल्या आहेत.
कडधान्यांना पसंती
- भाज्या महागल्याने गृहिणी घरातील कडधान्यांचा अधिकाधिक वापर करू लागल्या आहेत. त्यात मटकी, मूग, चवळीसारख्या कडधान्यांचा वापर वाढला.
- भाजीपाला नाशवंत असतो. त्याचा दरही जास्त आहे. कडधान्याचे भावही स्थिर राहतात आणि बरेच दिवस घरात साठवून ठेवता येत असल्याने भाज्यांच्या महागाईला त्रस्त गृहिणींनी कडधान्यांना पसंती दिली आहे.
एपीएमसीत कांदा-बटाटा बाजार बंद
शासनाने बाजार समित्यांमधून भाजीपाला, कांदा-बटाटा, फळ बाजारावरील नियमन मुक्त करण्याचा अध्यादेश काढला आहे. त्यामुळे थेट पणनच्या विरोधात सोमवारी तुभ्रे येथील एपीएमसीमध्ये कांदा-बटाटा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला होता. बंदला एपीएमसीमधील कांदा-बटाटा व फळ-भाजीपाला बाजारानेदेखील पाठिंबा दर्शविला आहे.