महागाईची लागण भाजीपाल्यालाही झाल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले असतानाच यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारला पुढाकार घ्यावा लागला आहे. गेल्या काही दिवसांत भाज्यांचे दर सतत चढेच राहिले आहेत. या पाश्र्वभूमीवर, सर्वसामान्यांना माफक दरांत भाज्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी सरकारतर्फे मुंबईत सोमवारपासून १०७ केंद्रांच्या माध्यमातून स्वस्तात भाजी विक्री सुरू करण्यात येणार आहेत. दुसरीकडे, दुष्काळामुळे भाजीपाल्याचे क्षेत्र १५ ते २० टक्क्य़ांनी घटल्याने यंदा भाजीपाला यापुढेही काहीसा महागच राहणार, असाही इशारा सरकारतर्फे देण्यात आला आहे.
कारण काय?
घाऊक बाजारात भाज्यांचे दर वाढल्याचे किरकोळ विक्रीच्या दरातही वाढ झाली आहे. सर्वसामान्यांना परवडणारा टोमॅटो तर ८० रुपये किलोंवर पोहोचला आहे. अन्य भाज्यांचे दरही कमालीचे वाढले आहेत. भाजीविक्रीतील दलालांमुळेही या दरांत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाल्याची चर्चा आहे.
होणार काय?
नागरिकांना स्वस्तात भाजीपाला उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अपना बाजार, सहकारी भांडार, सुपारीबाग, सहकारी ग्राहक भांडार यांच्या माध्यमातून स्वस्तात भाजीपाल्याची विक्री करण्यात येणार असल्याची माहिती पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवारी दिली. शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट मुंबईत आणण्यात येणार असून, यामुळे भाजीच्या दरांत ३० टक्केफरक पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा उपक्रम ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. ठाणे आणि कल्याणमध्येही माफक दरांत भाजी उपलब्ध होणार आहे. या भाजीपाल्यावर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा सेस आकारला जाणार नाही.  दुष्काळामुळे भाजीपाल्याचे क्षेत्र घटले आहे, तसेच शहराभोवतालची शेतीही कमी झाली आहे. या कारणांमुळे भाजीपाल्याची आवक आणि त्याचा दर यावर विपरीत परिणाम होऊ शकेल, असेही विखे-पाटील यांनी सांगितले.

Story img Loader