मुंबई : वाहन मालकांसाठी आता वाहन हस्तांतरणाची प्रक्रिया सोपी होणार आहे. सध्या ही सेवा ऑनलाईन असली तरीही कागदपत्रांची छापील प्रत काढल्यानंतर त्यावर सही करुन आरटीओत सादर करावे लागत होते. तसेच कागदपत्र पडताळणीसाठी जाणे गरजेचे होते. त्यामुळे वाहन हस्तांतरण प्रक्रिया आधार कार्डशी जोडल्यास वाहन मालकाची सर्व माहिती त्वरित त्या-त्या आरटीओला उपलब्ध होणार आहे. परिणामी, कागदपत्रे सादर करण्यासाठी आरटीओत जाण्याचा खटाटोप वाचणार आहे. ही सुविधा येत्या एका आठवड्यात सुरू केली जाईल, अशी माहिती परिवहन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> आरोपी महाराष्ट्रातच आहे ना? नवनीत राणांविरोधात कारवाई करत नसल्याने कोर्ट संतापलं, पोलिसांना सुनावले खडे बोल

राज्यातील आरटीओत दर दिवशी विविध कामांसाठी मोठया प्रमाणात वाहन मालक-चालक येतात. त्यांचा वेळ वाचवण्यासाठी परिवहन विभागाने बऱ्याच सेवा ऑनलाईन केल्या आहेत. परिवहन विभागामार्फत अनुज्ञाप्ती, नोंदणी प्रमाणपत्र, कर तसेच परवान्यासंबंधित ११५ सेवा देण्यात येत असून त्यातील 86 सेवा या ऑनलाईन दिल्या आहेत.  ८४ सेवांपैकी दहा सेवाही आधार कार्डशी जोडल्या आहेत. यामध्ये शिकाऊ लायसन्सची (अनुज्ञाप्ती) परिक्षा, वाहनांचा राष्ट्रीय परवाना सुविधाही ऑनलाईन करून त्या आधारकार्डशी जोडल्या. त्यापाठोपाठ दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, ना हरकत प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदलणे, अनुज्ञाप्तीचे नुतनीकरण या सेवाही आधारशी जोडल्याने आरटीओत जाण्याचा वेळ वाचला आहे. त्याचा वाहनधारकांना चांगलाच फायदा मिळत आहे.

हेही वाचा >>> जोगेश्वरी टर्मिनसच्या कामाला आठ महिन्यानंतर सुरुवात ; रेखाचित्र तयार करण्याचे काम सुरु मेल-एक्स्प्रेस गाड्या सुटणार

परिवहन विभागाने वाहन हस्तांतरण सेवादेखील आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय घेतला असून त्यावर कामही सुरु केले आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून एका आठवड्यात ही सेवा वाहन मालकांसाठी उपलब्ध होईल. जुन्या वाहनाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात वाहनाचे कायदेशीरपणे आरटीओतून नव्या मालकाच्या नावे हस्तांतरण करायचे झाल्यास स्वतंत्र प्रक्रिया पूर्ण करावी लागते. वाहन कर्जावर घेतले असल्यास त्याचा बोजा उतरविण्याची प्रक्रियाही करावा लागते. त्यातून वाहन नव्या मालकाच्या नावे हस्तांतरित होते. या प्रक्रियेत वाहनांची मूळ कागदपत्रे, अर्जावर जुन्या मालकाची संमती आदी बाबी आवश्यक असतात. विक्रेत्याचे घोषणापत्र, विकत घेणाऱ्याचे घोषणापत्र, पी.यु.सी प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र, कर प्रमाणपत्र लागते. यासाठी अर्ज आणि शुल्क ऑनलाईन करणे आणि काही कागदपत्रे डाऊनलोड करण्याची सुविधा परिवहनने उपलब्ध करून दिली असली तरीही ती कागदपत्रे डाऊनलोड करुन त्याची छापील प्रत काढली जाते आणि त्यावर सही करुन ती आरटीओत सादर करावी लागतात. वाहन मालकाचा बराच वेळ या प्रक्रियेत जातो. ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी परिवहन विभागाने वाहन हस्तांतरण प्रक्रिया आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. आधार कार्डशी जोडल्याने वाहन मालकाची सर्व माहिती आरटीओला उपलब्ध होईल. तसेच सहीचीही गरज लागणार नाही. कागदपत्रांच्या पडताळणीसाठी वाहन मालकांचा आरटीओत जाण्याचा वेळ वाचणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vehicle ownership transfer made easier if process link with aadhaar card zws