मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री छगन भुजबळ, सुभाष देसाई, विजय वडेट्टीवार यांच्यासह नऊ मंत्री आणि खासदार सुप्रिया सुळे, सुनील तटकरे यांच्या सुरक्षा ताफ्यात निर्भया निधीतून खरेदी केलेली वाहने देण्यात आली होती, असा आरोप भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सोमवारी केला. आपल्या सरकारच्या काळात निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकारच्या नावाने ओरड करायची, हा दुटप्पीपणा कशासाठी, असा सवाल त्यांनी केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्री व नेत्यांच्या सुरक्षा ताफ्यात निर्भया निधीत खरेदी केलेली वाहने असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला होता. त्याला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात केंद्र सरकारकडून मिळालेल्या निर्भया निधीतून ४ फेब्रुवारी २०२२ रोजी २२० वाहने खरेदी करून १२१ वाहने ९४ पोलीस ठाण्यांना देण्यात आली आणि ९९ वाहने इतर विभागांना देण्यात आली होती. हे वितरण १९ मे २०२२ रोजी करण्यात आले. ही वाहने ९ मंत्री व १२ अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आली होती. निर्भया निधीतून खरेदी केलेली वाहने पोलीस विभागाने जलद प्रतिसाद पथक, श्वान पथक, संरक्षण शाखा, सुरक्षा शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, विशेष शाखा, लाचलुचपत विभाग, मोटर परिवहन विभाग इत्यादी विभागांना करण्यात दिली. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळीत वाहतूक विभागाला १७ वाहने देण्यात आली. तेव्हा तत्कालीन सरकारच्या गृह विभागाला खंत का वाटली नाही, असा सवाल वाघ यांनी केला. आता शिंदे-फडणवीस सरकारने ही सर्व वाहने पुन्हा निर्भया पथकासाठी देण्याची कार्यवाही वेगाने सुरू केली आहे. ती आठवडाभरात पूर्ण होईल, असे वाघ यांनी म्हटले आहे.