मुंबई : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा आणि पुरातन वास्तू असलेल्या काळा घोडा परिसरातील पाच रस्ते हे दर शनिवारी व रविवारी सायंकाळी केवळ पादचाऱ्यांसाठी खुले ठेवण्यात येणार आहेत. प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान वाहनांसाठी बंद राहतील. तसेच या संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.

दक्षिण मुंबईतील काळा घोडा परिसर हा ऐतिहासिक आणि पुरातन खाणाखुणा जपणारा परिसर आहे. नागरिक, पर्यटक आदींची या भागात नेहमीच वर्दळ असते. पर्यटकांना ‘हेरिटेज वॉक’चा आनंद घेता यावा, येथील पुरातन वास्तू न्याहाळता याव्यात या उद्देशाने काळा घोडा परिसरातील साईबाबा मार्ग, रोप वॉक लेन, व्ही. बी. गांधी मार्ग/फोर्ब्स स्ट्रीट, रुदरफोर्ड स्ट्रीट आणि बी भरुचा मार्ग हे पाच रस्ते प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान वाहनांसाठी बंद करुन केवळ पादचाऱ्यांसाठी सुरु ठेवण्याचा आणि या संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.

हेही वाचा >>> Mumbai Ring Road : मुंबई ट्रॅफिक फ्री होणार! ९० किमी रस्त्यांचं जाळं, सात रिंग रोडसाठी ५८,५१७ कोटींचं बजेट, MMRDA शहराचा चेहरामोहरा बदलणार

काळा घोडा हा मुंबईचा कला परिसर आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय, जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, इन्स्टिट्यूट ऑफ कंटेम्पररी आर्ट आणि इलियाहू सिनेगॉग आहे. या परिसरातील पर्यटन वाढवण्यासाठी ही योजना आहे. विधानसभा अध्यक्ष आणि भाजपचे स्थानिक आमदार राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली कुलाब्यातील अनेक सुशोभीकरण योजनांपैकी ही एक योजना आहे.

हेही वाचा >>> Mumbai Traffic Issue: मुंबईच्या वाहतूक समस्येवरचा उपाय; MMRDA नं मंजूर केले ५८ हजार कोटींचे प्रकल्प; पाच वर्षांत होणार मनस्तापातून सुटका?

काळा घोडा परिसरातील पादचारी मार्गांची, सुशोभीकरण कामांची बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि सह पोलीस आयुक्त (वाहतूक)अनिल कुंभारे यांनी नुकतीच पाहणी केली. काळा घोडा परिसरातील पादचारी मार्ग तसेच सुशोभीकरणाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामांचा यावेळी आयुक्तांनी आढावा घेतला. सहायक आयुक्त (ए विभाग) जयदीप मोरे, संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

या दरम्यान त्यांनी स्थानिक नागरिक, व्यापारी, पर्यटक, कर्मचारी आदींशी संवाद साधला. तसेच हा परिसर अधिकाधिक सुंदर करण्यासाठी त्यांच्या प्रतिक्रिया, सूचना आदी जाणून घेतल्या. केवळ पादचारी मार्ग ही शहरासाठी एक नवीन संकल्पना आहे आणि या योजनेत सुधारणा करण्यासाठी अभिप्राय विचारात घेतले जातील. ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि विशेष गरजा असलेल्या नागरिकांसाठी, आरएफआयडी आधारित वाहन प्रवेश असेल. प्रतिबंधित क्षेत्रात त्याची वेगमर्यादा ताशी २० किमी पेक्षा जास्त नसेल, अशी माहिती माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी दिली.