वाहनांचा वेग प्रतितास १६० किलोमीटर
मुंबई : वाहतुकीसाठी खुल्या झालेल्या समृद्धी महामार्गावर वाहनचालक वेग मर्यादेच्या नियमांचे सर्रांस उल्लंघन करीत भरधाव वेगात वाहने चालवत आहेत. या महामार्गावर वेग मर्यादेचे नियम पायदळी तुडविल्याप्रकरणी ११ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान ६१३ प्रकरणांची नोंद झाली आहे. या प्रकरणांमध्ये महामार्गावरून प्रतितास १६० किलोमीटर वेगाने वाहने चालविण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. परिणामी, वेग मर्यादेचे उल्लंघन रोखण्याचे मोठे आव्हान महामार्ग वाहतूक पोलिसांसमोर आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या पन्नाशीपार गेली आहे.
नागपूर – शिर्डी समृद्धी महामार्ग ११ डिसेंबरपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या महामार्गामुळे नागपूर – शिर्डी अंतरही पाच तासांत पार करता येणार आहे. प्रशस्त अशा या समृद्धी महामार्गावर अवजड वाहनांसाठी प्रतितास ८० किलोमीटर आणि हलक्या वाहनांसाठी प्रतितास १२० किलोमीटर वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र या वेगमर्यादेचे अनेक वाहनचालक पालन करीत नाहीत.
हेही वाचा >>> मुंबईत आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार! जाहीर सभेतून कुणाला करणार लक्ष्य?
या महामार्गावर वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलीस कारवाईचा बडगा उगारत आहेत. वाहनचालक प्रतितास १६० किलोमीटर वेगाने वाहन चालवित असल्याचे वाहतूक पोलिसांच्याया कारवाईदरम्यान निदर्शनास आले आहे. तसेच प्रतितास १५५ किलोमीटर आणि प्रतितास १५१ किलोमीटर वेगानेही वाहने चालवण्यात येत आहेत.
महामार्गावर वेग मर्यादेच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ११ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत ६१३ प्रकरणांची नोंद झाली असून या वाहनचालकांवर एकूण १२ लाख २६ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावरून जाताना सीटबेल्ट न लावल्यामुळे ७८, तर परवानगी नसतानाही वाहन उभे करणे तसेच अन्य कारणांमुळे १७३ प्रकरणांची नोंद झाली आहे. दुचाकीस्वार आणि त्याच्या सहकारी प्रवाशाने हेल्मेट परिधान न केल्यानेही वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा ३० प्रकरणांची नोंद झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अपघातांची पन्नाशीपार
भरधाव वेगात चालविण्यात येणारी वाहने आणि वाढते अपघात यामुळे समृद्धी महामार्ग चर्चेचा विषय बनला असून या महामार्गावर आतापर्यंत अपघातांची संख्या पन्नाशीपार गेली आहे. यापैकी तीन प्राणांतिक अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. गंभीर अपघातांची संख्या पाच असून यामध्ये नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच २१ किरकोळ अपघातांमध्येही २९ जण जखमी झाले असून उर्वरित २१ अपघातांत कोणीही जखमी झालेले नाही.