मुंबई : माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्यासह विविध क्षेत्रांतील सहा मान्यवरांना दि साऊथ इंडियन एज्युकेशनतर्फे देण्यात येणारा ‘श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय  पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दि साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी (एसआयईएस)च्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे यंदाचे २५ वे वर्ष होते. षण्मुखानंद सभागृहात शनिवारी पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.  एसआयईएस संस्थेचे अध्यक्ष डॉ. व्ही. शंकर यांच्या हस्ते मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कांची कामकोटी पीठाचे ६८ वे शंकराचार्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांच्या स्मृतीनिमित्त हा पुरस्कार देण्यात येतो. आतापर्यंत अनेक नामवंतांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

 मातृभाषेतून शिक्षण, मातृभूमीचा अभिमान, भारतीय परंपरा, संस्कृती ही जपायला हवी, असे मत व्यंकय्या नायडू यांनी या वेळी व्यक्त केले. पुरस्कार हे पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरतात. मी कोणताही पुरस्कार स्वीकारत नाही, पण शंकराचार्य यांच्या नावाने दिलेला हा पुरस्कार मला मोलाचा वाटतो, असेही ते म्हणाले. मी कोणत्याही कार्यक्रमाला गेलो तरी माझ्या ठरलेल्या दाक्षिणात्य पोशाखातच जातो. आपली संस्कृती, संतांची शिकवण पुढच्या पिढीने आचरणात आणली तर एक दिवस आपण नक्की विश्वगुरू होऊ, असाही विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

 उद्योगपती रतन टाटा हे या कार्यक्रमाला हजर राहू शकले नाहीत. ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून त्यांनी संस्थेचे आभार मानले. या वेळी पद्मविभूषण डॉ. मरतडा वर्मा शंकरन वलियाथन, सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय के. सूद, भारत – विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि हरिकथा प्रतिपादक विशाखा हरी यांनाही चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. वलियाथन यांनी कमी किमतीची कृत्रिम हृदय झडप विकसित केली आहे.   भारताला खूप मोठी महान परंपरा, संस्कृती आहे. संतांची शिकवण, गुरुपरंपरा, संस्कृती यामुळे भारतीय समाज आजच्या कठीण काळातही तग धरू शकला, असे मत आरिफ मोहम्मद खान यांनी व्यक्त केले.  पुरस्कार सोहळय़ाच्या रौप्यमहोत्सवी वर्षांत पूर्वीच्या पुरस्कार विजेत्यांचाही सत्कार करण्यात आला. गेल्या २४ वर्षांत ९४ उत्कृष्ट व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Venkaiah naidu ratan tata arif mohammad khan conferred chandrasekharendra saraswati national award mumbai news ysh