सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाची कारवाई रद्द करण्याचा निर्णय दिला. यानंतर शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर आणि भाजपा नेते केशव उपाध्ये यांच्यात ट्विटरवर शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं. उर्मिला मातोंडकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया दिली. यावर केशव उपाध्ये यांनी उर्मिला मातोंडकरांवर निशाणा साधत वडाची साल पिंपळाला लाऊ नका, असं मत व्यक्त केलं. यावर मातोडकरांनी उपाध्ये यांना आपला तो बाब्या असं म्हणत टोला लगावला.
केशव उपाध्ये म्हणाले, “थोडी माहिती घ्या. आपलं वाचन चांगल आहे असं ऐकून आहे. दोन्ही विषय पूर्णपणे वेगळे आहेत. उगाच वडाची साल पिंपळाला लाऊ नका. आमदारांना सर्व कायदे नियम धाब्यावर बसवून निलंबित करण्यात आले होते. राहिला तुमच्या आमदाकीचा विषय, तर त्यासाठी लोक न्यायालयात गेली होती, पण न्यायालयाने काही सांगितलं नाही.”
“‘वडाची साल’ ऐवजी ‘आपला तो बाब्या’ जास्त बरोबर”
उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, “अर्थातच विषय पुर्णतः वेगळे आहेत म्हणूनच “आनंद/अभिनंदन”. पण प्रश्न मात्र महाराष्ट्राच्या जनतेच्या हक्कांचा आहे आणि लोकशाहीचा तर आहेच आहे. त्यामुळे “वडाची साल” ऐवजी “आपला तो बाब्या” जास्त बरोबर आहे. माझ्या आमदारकीची चिंता नसावी. त्याने माझे काम थांबलेले नाही.”
“आपली जळजळ, तळमळ ही केवळ ‘आमदारकी’साठीच आहे”
उर्मिला मातोंडकर यांच्या या प्रतिक्रियेवर केशव उपाध्ये म्हणाले, “आपली जळजळ, तळमळ ही केवळ ‘आमदारकी’साठीच आहे, हे आपल्या ट्वीटवरून लक्षात येतेच. महाराष्ट्रात एवढे गंभीर विषय घडत असताना, आपण त्यावर फारसे भाष्य केलेले दिसत नाही. पण आमदारकीचा विषय आला, की आपल्यातील ‘प्रतिक्रियावादी’ भूमिका सगळे काही स्पष्ट करते. बाकी आमदारकीसाठी शुभेच्छा.”
उपाध्ये यांच्या या टीकेवर उर्मिला मातोंडकर यांनी पुन्हा एकदा भाजपाला टोला लगावला. “गेली २ वर्ष “जळजळ,तळमळ” आणि “जळफळाट” हे शब्द कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत हे महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेला माहित आहे. मुद्दा सोडून बोलण्यात तथ्य नसतं. मुद्दा लोकशाहीचा, लोकहिताचा आहे. बाकी माझ्या जळजळीकरता अँटासिड (Antacid) आहे. आपण आपला विचार करा,” असं मत मातोंडकर यांनी व्यक्त केलं.