मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील आणखी दोन माजी नगरसेवकांनी ठाकरे यांना अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. माजी नगरसेवक राजू पेडणेकर, माजी नगरसेवक आणि उपविभागप्रमुख संजय पवार यांनी ठाकरे यांची साथ सोडली आहे. कुर्ल्यातील माजी नगरसेविका डॉ. अनुराधा पेडणेकर यांनीही यावेळी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेतून (ठाकरे) सातत्याने शिवसेनेत (शिंदे) माजी नगरसेवक प्रवेश करीत आहेत. जानेवारी महिन्यात वर्सोवा मतदारसंघातील राजुल पटेल यांनी ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ केला. पंधरा दिवसांपूर्वी वांद्रे विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे (ठाकरे) उपविभागप्रमुख जितेंद्र जनावळे यांनीही शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला. त्यानंतर रविवारी माजी नगरसेवक राजू पेडणेकर, माजी नगरसेवक आणि उपविभागप्रमुख संजय पवार यांनी ठाकरे यांची साथ सोडली आहे. तसेच कुर्ल्यातील माजी नगरसेविका डॉ. अनुराधा पेडणेकर यांनीही यावेळी शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला.

या माजी नगरसेवकांसोबत शाखाप्रमुख, उपविभागप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, उत्तर भारतीय कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा सेना, वारकरी संप्रदाय, मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते. या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले. ठाकरे गटाकडून आतापर्यन्त ५० माजी नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आहेत.

काहीजण निर्धार सभा, निर्धार शिबीर घेऊन सगळ्यांना आईशी गद्दारी करू नका असे सगळ्यांना सांगत आहेत. मात्र ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला दूर ठेवले. त्या बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले, धनुष्यबाण गहाण टाकला, म्हणून अडीच वर्षांपूर्वी आम्हाला उठाव करावा लागला आणि सर्वसामान्यांच्या मनातले सरकार आणावे लागले, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.आता मुंबई महापालिकेवर भगवा झेंडा फडकवायचा असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. आपण चांगले काम करत आहोत, म्हणून त्यांना पोटदुखी होत आहे, अशी टीका शिंदे यांनी केली. तुम्ही कितीही टीका केली तरी तुम्हाला कामातून उत्तर देणार, असा पुनरुच्चार त्यांनी केला. तुम्हाला लोक का सोडवतात त्यांचे आत्मचिंतन करा, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीपासूच ठाकरे गटाच्या वर्सोवा विधानसभा मतदारसंघात धुसफूस सुरू होती. खरे तर त्याआधीपासूनच या मतदारसंघात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आलबेल नव्हते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा वाद उफाळून आला होता. या मतदारसंघांसाठी राजू पेडणेकर आणि राजुल पटेल हे इच्छुक होते. मात्र या दोघांना डावलून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अल्पसंख्यांक उमेदवार दिला होता. शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार हारून शेख निवडून आले. या निवडणुकीत राजू पेडणेकर यांनी बंडखोरी केली होती. तेव्हाच ठिणगी पडलेली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने मुंबई महापालिकेच्या प्रभागांची संख्या २२७ करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनीच ठाकरे गटाकडून आव्हान दिले होते.

Story img Loader