मुंबई : सागरी किनारा मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील वर्सोवा – दहिसरदरम्यानच्या विस्तारासाठी कांदिवली परिसरातील रहिवाशांनी वृक्षारोपण केलेली ३०० हून अधिक झाडे हटविण्यात येणार असल्याची नोटीस काही दिवसांपूर्वी महापालिकेने झाडांवर लावली होती. दरम्यान, या वृक्षतोडीला स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध केला आहे. महापालिकेने सागरी किनारा मार्गाच्या विस्तार प्रकल्पासाठी झाडांबाबत सुधारित आराखडा सादर करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सागरी किनारा मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील वर्सोवा – दहिसर मार्गाच्या विस्तारासाठी कांदिवलीमधील चारकोप सेक्टर ८ परिसरातील ३०० हून अधिक झाडे तोडण्यास स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध केला. या प्रश्नासंदर्भात आमदार संजय उपाध्याय आणि स्थानिक रहिवाशांनी पालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी निवासी इमारतींजवळील एकूण १९० झाडे, तसेच रस्त्याच्या बाजूने लागूनच असलेल्या खारफुटीची संरक्षक भिंत हटवण्याच्या प्रस्तावाला नागरिकांनी तीव्र विरोध केला. तसेच खारफुटी क्षेत्र नष्ट होण्याची चिंता व्यक्त केली. याचबरोबर सेक्टर ८ मध्ये एकूण २३ इमारती आहेत. प्रत्येक इमारतीत साधारण ९०- ९५ सदनिका आहेत. इमारतीच्या आवारात पुरेशी वाहनतळ व्यवस्था नाही. मात्र या बांधकामामुळे येथील वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होईल आणि यामुळे भविष्यात परिसरात वाहतूक कोंडीची समस्या उद््भवेल, असे मत पर्यावरणप्रेमी मिली शेट्टी यांनी व्यक्त केले.

सुधारित आराखड्याची मागणी

दरम्यान, सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या विस्तार प्रकल्पात अडथळा बनणाऱ्या झाडांबाबत सुधारित आराखडा सादर करावा, अशी मागणी आमदार संजय उपाध्याय यांनी पालिका अधिकाऱ्यांकडे केली आहे. किती झाडे जतन करता येतील आणि किती झाडे तोडून टाकावी लागतील याची अचूक माहिती सुधारित आराखड्यात नमूद करावी. याप्रकरणी लवकरच सर्वेक्षणही करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रक्रियेत झाडांचे आणि एकंदरच परिसराचे नुकसान होणार नाही, अशी ग्वाही उपाध्याय यांनी स्थानिकांना दिली.

पुर्नरोपण शक्य नाही – रहिवासी

मुंबईच्या दक्षिण टोकापासून उत्तर टोकापर्यंत, म्हणजे नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत झटपट पोहोचता यावे यासाठी सागरी किनारा रस्ता प्रकल्प टप्प्या-टप्प्याने बांधण्यात येत आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतचा धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) उभारण्यात आला आहे. दरम्यान, सागरी किनारा मार्गाच्या वर्सोवा – दहिसर या दुसऱ्या टप्प्यातील बांधकामासाठी कांदिवलीमधील चारकोप परिसरातील ३०० हून अधिक झाडे तोडण्यात येणार असल्याची नोटीस पालिकेने झाडांवर लावली आहे. याबाबत कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. या नोटीसांमध्ये सागरी किनारा मार्गाच्या विस्तारीकरणासाठी झाडे तोडण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, तोडण्यात येणारी झाडे गेल्या अनेक वर्षांपूर्वी लावण्यात आली आहेत. त्यामुळे ही झाडे पुर्नरोपण करणेही शक्य नाही, असे मत स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केले.