माळीण गावातील निसर्गाच्या प्रकोपानंतर गुरुवारी भल्या पहाटेपासून मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पावसाने जोर धरला आणि पावसाच्या या ‘रावण’सरींनी मुंबईकरांचा थरकाप उडाला. पावसाने मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेची सेवा विस्कळीत झाली तर सिग्नल यंत्रणेमुळे मेट्रोची वाहतूकही ढेपाळली होती. चेंबूर येथे दरड कोसळून गणेश खुराडे (वय ६) हा मुलगा मृत्युमुखी पडला तर वर्सोवा समुद्रात पोहायला गेलेला रफिकउल्ला शहा (वय १७) हा तरुण लाटेबरोबर ओढला जाऊन बेपत्ता झाला.
गुरुवारी सकाळपासूनच मुंबई आणि परिसरात धो धो पाऊस कोसळत होता. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये नाल्याकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले आणि कच्च्याबच्च्यांना घेऊन सुरक्षितस्थळी पोहोचण्यासाठी रहिवाशांची धडपड सुरू झाली. अनेक भाग जलमय झाल्याने रस्त्यांवरील वाहतूक मंदावली आणि घरी पोहोचण्यासाठी धडपडणाऱ्या मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. पावसाचा जोर वाढल्याने अनेक शाळा लवकर सोडून देण्यात आल्या. पावसाचा जोर वाढू लागला तशा मुंबईकरांच्या मनात २६ जुलै २००५ च्या आठवणी ताज्या झाल्या. त्यातच ढगफुटीच्या अफवांची भर पडल्याने अनेक नोकरदारांनी दुपारीच घरचा रस्ता धरला. पावसाचा जोर वाढू लागल्याने पालिका आयुक्त सीताराम कुंटे कार्यकारी अभियंत्यांना २४ तास कार्यालयात थांबण्याचे आदेश दिले. साचलेल्या पाण्याचा झटपट निचरा व्हावा यासाठी पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी विविध विभागांत तैनात होते. मात्र पर्जन्य जलवाहिन्यांच्या जाळ्यांवर कचरा साचल्याने अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होत नव्हता. पालिका कर्मचारी पोहोचू न शकलेल्या ठिकाणी नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी जाळ्यांवरील कचरा हटवून पाण्याला मार्ग मोकळा करून दिला.
चेंबूरमध्ये दरड कोसळून बालकाचा मृत्यू
चेंबूर येथील सह्य़ाद्रीनगर या भागात एका झोपडीवर पहाटे पावणेसात वाजता दरड कोसळल्याने गणेश खुराडे या सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. त्याचे वडील या दुर्घटनेत जखमी झाले. याच परिसरातील आणखी एक झोपडीही खचली, मात्र त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. साकीनाका चकाला येथे राहणारी तीन मुले पोहण्यासाठी वर्सोवा येथे समुद्रात गेली होती. त्यातील रफिकउल्ला हा लाटेबरोबर ओढला जाऊन बेपत्ता झाला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता.
मेट्रोलाही सोसवेना पावसाचा भार!
आंतरराष्ट्रीय मानांकनांप्रमाणे उभारलेल्या नाजूक मेट्रोराणीला मुंबईच्या पावसाचा भार सोसत नसल्याचे गेल्या दोन दिवसांपासून स्पष्ट होत आहे. मुंबईत गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मेट्रोची वाहतूक सतत कोलमडत असल्याचे समोर आले आहे.
रेल्वेचाही गोंधळ
पाणी तुंबल्यामुळे पश्चिम, मध्य आणि हार्बर या तीनही मार्गावरील वाहतूक तब्बल २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू होती. दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने मस्जिद ते भायखळा या स्थानकांदरम्यान पाणी भरू लागले. भरतीची वेळ असल्याने साडेचापर्यंत या भागात सुमारे दोन इंच पाणी भरले होते. त्यातच भायखळ्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने गोंधळात भर पडली. मध्य आणि हार्बर मार्गावरील सुमारे १४ सेवा ऐन गर्दीच्या वेळी रद्द करण्यात आल्या.
वाहतूक कोलमडली
गिरगाव, ग्रॅन्ट रोड, मुंबई सेंट्रल, सातरस्ता, भायखळा, घोडपदेव, लालबाग, हिंदमाता, परळ, दादर, वांद्रे, विलेपार्ले, अंधेरी, कांदिवली, मालाड, बोरिवली, दहिसर, घाटकोपर आदी ठिकाणचे रस्ते जलमय झाले आणि रस्ते वाहतुकीचे तीन तेरा वाजले. बेस्टच्या बसगाडय़ा अन्य मार्गाने वळवाव्या लागल्या. जुलैमध्ये पडलेल्या पावसामुळे खड्डेमय झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात पालिका अपयशी ठरली आहे.
मुंबईत रावणसरी!
माळीण गावातील निसर्गाच्या प्रकोपानंतर गुरुवारी भल्या पहाटेपासून मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पावसाने जोर धरला आणि पावसाच्या या ‘रावण’सरींनी मुंबईकरांचा थरकाप उडाला.
First published on: 01-08-2014 at 04:00 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Very heavy rains lash mumbai