मुंबई : मुंबई महापालिकेने प्रकल्पबाधितांसाठी माहुल येथे बांधलेली घरे कर्मचाऱ्यांना स्वस्तात देण्याचे ठरवलेले आहे. मात्र कर्मचाऱ्यांकडून या घरांसाठी अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत केवळ १७५ अर्ज महापालिकेकडे आले होते. त्यामुळे अर्ज करण्यासाठीची मुदत वाढवण्यात येणार आहे. तसेच पालिकेच्या अन्य कर्मचाऱ्यांना, शिक्षकांनाही ही घरे विकत देता येतील का किंवा भविष्यात सर्वसामान्य मुंबईकरांसाठी ही घरे विकत देता येतील का याचा पालिका प्रशासन विचार करीत आहे.
मुंबई महापालिकेने पूर्व उपनगरात माहुल येथे प्रकल्पबाधितांसाठी घरे बांधली आहेत. यापैकी काही घरांमध्ये प्रकल्पबाधित राहतात. तर बहुतांशी घरे रिकामी आहेत. या घरांचा मोठा देखभाल खर्च मुंबई महापालिकेला करावा लागतो. त्यामुळे मुंबई महापालिकेने माहुल येथील १३ हजारपैकी ९,०९८ घरे मुंबई महापालिकेने विक्रीला काढली आहेत. ही घरे महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कामगारांना स्वस्तात विकत देण्याचे ठरवले आहे. या योजनेअंतर्गत एक घर १२ लाख ६० हजार रुपयांत, तर दोन घरे २५ लाख २० हजार रुपयांत खरेदी करू शकणार आहेत. त्यासाठी म्युनिसिपल बँकेकडून ८.५० टक्के व्याज दराने ९० टक्के कर्जही दिले जाणार आहे. १७ मार्चपासून या घरांसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. १५ एप्रिल ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. या योजनेला फारसा प्रतिसाद नसल्यामुळे प्रशासनाने कामगार संघटनांचीही मदत घेतली होती. मात्र तरीही शेवटच्या दिवसांपर्यंत केवळ १७५ अर्ज आले होते. त्यामुळे प्रशासनाने या घरांसाठी अर्ज करण्याकरीता मुदत वाढवण्याचे ठरवले आहे.
सफाई कामगारांचा या घरांना फारसा प्रतिसाद नसल्यामुळे पालिकेने आता नवीन पर्यायांचा विचार करण्याचे ठरवले आहे. या घरांना शिक्षकांकडून, ज्येष्ठ नागरिकांकडूनही मागणी आहे. त्यामुळे यांना देखील ही घरे विकत देता येतील का याचाही विचार पालिका प्रशासन करीत आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांनाही ही घरे विकत देता येतील का याचीही चाचपणी सुरू असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. या घरांचे दर हे वार्षिक मूल्यदरानुसार (रेडीरेकर) ठरवण्यात आले असून त्याच दराने ही घरे विकत दिली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वार्षित सात कोटीचा देखभाल खर्च
सफाई कर्मचाऱ्यांसाठी माहुलमध्ये उभारण्यात आलेल्या घरांपोटी वर्षाकाठी पालिकेला ७ कोटी रुपये देखभाल खर्च येतो. ही घरे रिकामीच राहिली तर त्याचा तोटा पालिकेलाच होणार आहे. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी मुंबई महापालिकेतील कामगार संघटनांबरोबर चर्चा करणार आहे. त्याचबरोबर निवृत्त झालेले सफाई कर्मचारी जर ही घरे घेण्यास इच्छुक असतील तर त्यांनाही ती देण्याबद्दल विचार केला जाणार असल्याचे पालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.
– एवर स्माईल पी ए पी संकुल, माहुल आंबा पाडा, आणिक गाव, येथील सदनिका खरेदीतत्वावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
– ही योजना केवळ पालिकेच्या तृतीय व चतुर्थ कर्मचाऱ्यांसाठी आहे.