टीव्ही मालिकांमधून अभिनय करणाऱ्या उर्वशी ढोलकिया सहाव्या पर्वाची ‘बिग बॉस’ ठरली असली तरी या सहव्या पर्वाचे ब्रीदवाक्य ‘अलग छे’ असे होते आणि म्हणून मला वाटले होते की इमाम सिद्दिकी जिंकेल. म्हणूनच की काय मी या शोमध्ये विजेती ठरेन आणि ५० लाख रुपयांचे पारितोषिक जिंकेन याची सुतराम कल्पना नव्हता. जिंकल्याचा आनंद तर खूप झाला आहे, परंतु त्याहीपेक्षा आश्चर्यही  वाटले, अशा शब्दांत ‘बिग बॉस’ उर्वशी ढोलकियाने आपल्या भावना व्यक्त केल्या.
डेलनाझ बाद झाली तेव्हा मला धक्का बसला होता. तीसुद्धा सशक्त स्पर्धक होती. किंबहुना कदाचित तीच जिंकेल असे मला वाटले होते, असेही उर्वशीने मोकळेपणी सांगितले.
इमाम सिद्दिकीचे बिग बॉसच्या घरातील अनेकांशी भांडण झाले असले तरी वाईल्ड कार्ड प्रवेशानंतर तो महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरला. बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धकांमध्ये इमाम हाच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात ‘परफेक्ट’ होता, असे मतही उर्वशीने व्यक्त केले. ‘बिग बॉसं’च्या घरात वागताना मी अतिशय प्रामाणिकपणे आणि या शोला हवे त्या प्रमाणे वागले. कोणाचेही भांडण झाले तरी त्यात मी कुणा एकाचीच बाजू कधी घेतली नाही. उलट स्पष्टपणे आपली मते व्यक्त केली, असे सांगून उर्वशी म्हणाली की, ‘बिग बॉस’सारख्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याने खूप काही शिकायला मिळाले. सना, निकेतन, मिंक, नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासारखे मित्र मिळाले. या कार्यक्रमामधून खूप शिकायला मिळाले एवढे नक्की, असे मत उर्वशीने व्यक्त केले.