लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : चित्रपट लेखक, दिग्दर्शक, निर्माते, चित्रकार अशी बहुपेडी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते प्रकाश भेंडे यांचे मंगळवारी निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांचे पार्थिव शीव येथील त्यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सूना आणि नातवंडे असा परिवार आहे. दिवंगत अभिनेत्री उमा भेंडे यांचे ते पती होत.
कलेची आवड आणि लहानपणापासून अभिनय, स्टेज शोमधून घेतलेला सहभाग यामुळे चित्रपट क्षेत्राकडे आकृष्ट झालेल्या प्रकाश भेंडे यांनी केवळ चित्रपटातून नावलौकिक कमावला नाही. तर त्यांच्यातील चित्रकारालाही त्यांनी मनापासून जपले. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन ते सातत्याने मुंबईतील नामांकित आर्ट गॅलरीत भरवत असत. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील मुरुड – जंजिरा येथे झाला असला तरी त्यांचे लहानपण मुंबईत गिरगावातच गेले. ते सतरा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे अकस्मात निधन झाले आणि कुमारवयातच सगळ्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्यांना टेक्स्टाईल डिझायनर व्हायचे होते, पण त्यांचे ते स्वप्न कधीच पूर्ण झाले नाही.
भेंडे गिरगावातच लहानाचे मोठे झाल्याने तिथे होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून त्यांनी सहभाग घेतला होता. रंगमंचाशी अशा पध्दतीने जोडले जाण्यातून त्यांची कलेची आवड वृध्दिंगत होत गेली. सुरुवातीला त्यांनी ‘चिमुकला पाहुणा’, ‘अनोळखी’, ‘नाते जडले जिवांचे’ अशा चित्रपटांमधून कधी छोटेखानी, तर कधी नायकाच्या भूमिका केल्या. त्यानंतर त्यांनी स्वत:च निर्माता होण्याचा निर्णय घेत ‘भालू’ या चित्रपटाची निर्मिती केली. राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘भालू’ या चित्रपटात प्रकाश भेंडे यांनी पत्नी अभिनेत्री उमा भेंडे यांच्याबरोबर एकत्र काम केले.
‘भालू’ हा चित्रपट चांगला चालला आणि प्रकाश भेंडे यांना चित्रपट निर्मितीची लेखन, दिग्दर्शन, वितरण अशी विविध अंगे खुणावू लागली. त्यांनी उमा भेंडे यांच्याबरोबर ‘चटकचांदणी’, ‘आपण यांना पाहिलंत का?’, ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’, ‘आई थोर तुझे उपकार’ असे अनेक चित्रपट त्यांनी केले. उमा भेंडे यांच्या निधनानंतर त्यांनी पत्नीबरोबरचा एकत्रित प्रवास ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या आत्मचरित्राच्या रुपात शब्दबध्द केला. सदैव उत्साही आणि शेवटपर्यंत चित्रपटांबरोबरच मनापासून चित्रकलेत रमलेल्या या ज्येष्ठ कलाकाराच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीचे आणखी एक पर्व लयाला गेल्याची भावना चित्रपटसृष्टीत व्यक्त होते आहे.