तब्बल सहा दशके हिंदी चित्रपटसृष्टीचा ‘प्राण’ म्हणून मिरवणाऱ्या या अभिनेत्याला २००१ मध्ये ‘पद्मभूषण’ किताब देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी फिल्मफे अर पुरस्कार, राज कपूर पुरस्कार असे कित्येक मानाचे पुरस्कार मिळवले होते. भारतीय चित्रपटसृष्टी शंभर वर्षांची वाटचाल पूर्ण करत असतानाच प्राण यांना दादासाहेब फाळके जीवनगौरवसारख्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवले जावे, हाही एक छान योगायोग होता.
समर्थ अभिनयासाठी दादासाहेब फाळकेंच्या नावाने दिला जाणारा सर्वोच्च जीवनगौरव पुरस्कार त्यांच्या थरथरच्या हातांनी वयाच्या ९३ व्या वर्षी स्वीकारला तेव्हा त्यांचे डोळे पाणावले होते. उशिराने का होईना पण, कामाचे कौतुक झाले, असा भाव त्या मोठय़ा डोळ्यांत दाटला होता. हिंदी चित्रपटसृष्टीत नायक-नायिका कितीतरी मिळतील पण, खलनायक आणि चरित्रनायक म्हणून ज्या मोजक्या कलाकारांनी बॉलिवूडवर आपला ठसा उमटवला त्यात प्राण यांचे नाव मोठे होते. शुक्रवारी लीलावती रूग्णालयात रात्री साडेआठ वाजता अभिनयातील या सिकंदराने अखेरचा श्वास घेतला आणि बॉलिवूडचा ‘प्राण’ हरपला, अशी एकच भावना सगळ्यांच्या मनात घर करून गेली आहे. शनिवारी दुपारी १२ वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
जुन्या दिल्लीतील कोटगड येथे १९२० साली एका श्रीमंत पंजाबी कु टुंबात जन्माला आलेल्या प्राण यांचे आयुष्यही तितक्याच नाटय़मय घटनांनी भरलेले होते. प्राण यांचे वडील लाला केवल कृष्ण सिकंद कंत्राटदार होते. सरकारी कामांनिमित्त ते सतत भ्रमंती करीत असायचे. त्यामुळे प्राण यांचे शालेय शिक्षण कपूरथला, उन्नाव, मेरठ, डेरहादूत आणि रामपूर येथे झाले. गणितात विशेष प्राविण्य असलेल्या प्राण यांना छंद होता तो मात्र छायाचित्रकारितेचा. या छंदाचे व्यवसायात रूपांतर करण्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी भटकणाऱ्या प्राण यांची गाठ लाहोरमध्ये चित्रपट लेखक वाली मोहम्मद यांच्याशी पडली आणि त्यांच्याच ओळखीतून पंजाबी चित्रपट निर्माते दलसुख पांचोली यांच्या ‘यमला जट’ चित्रपटात त्यांना पहिली भूमिका मिळाली. १९४२ साली याच पांचोलींनी त्यांना ‘खानदान’ या आपल्या हिंदी चित्रपटात भूमिका दिली. त्यानंतर १९४२ ते ४६ पर्यंत तब्बल २२ चित्रपटांमधून प्राण यांनी काम केले होते. पण, त्यांची ही कारकिर्द बहरली होती ती लाहोरमध्ये. भारत-पाकिस्तान फाळणीमुळे त्यांच्या या बहरत्या कारकिर्दीला जोरदार धक्का बसला. त्यानंतर प्राण यांनी मुंबई गाठली.
मुंबईत आल्यानंतर आठ महिन्यांनी त्यांना नाटककार सआदत हसन मंटो यांच्यामुळे त्यांना देव आनंद आणि कामिन कौशल यांची मुख्य भूमिका असलेला बॉम्बे टॉकीजचा जिद्दी चित्रपट त्यांना मिळाला. या जिद्दी चित्रपटाने नायक म्हणून देव आनंदला यश मिळवून दिले आणि याच चित्रपटामुळे प्राण यांची अभिनयाची गाडी हिंदी चित्रपटसृष्टीत जोरदार धावू लागली. प्राण यांच्या ५७ वर्षांच्या लांबलचक कारकिर्दीत त्यांनी ३५० चित्रपटांमधून काम केले आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायक म्हणून प्रेमनाथ, प्रेम चोप्रा, अजित, अमरीश पुरी अशा काही मोजक्याच कलाकारांनी आपली स्वत:ची एक शैली निर्माण केली होती. प्राण यांचे नाव या परंपरेत सर्वात मोठे होते. पण, ते केवळ खलनायक म्हणून नव्हे तर चरित्र नायक म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. खलनायकाच्या भूमिकेमुळे अनेक जण त्यांचा द्वेषही करत असत. मात्र, प्रत्यक्षात प्रेमळ स्वभावाच्या प्राण यांचे चित्रपटसृष्टीमधील अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. छायाचित्रण, चित्रपटांबरोबरच त्यांचे क्रीडा क्षेत्रावरही अतोनात प्रेम होते. १९५० च्या दशकामध्ये त्यांचा डायनॉमोस फुटबॉल क्लब अनेकांचा चर्चेचा विषय बनला होता.
बॉलिवूडचा ‘प्राण’ हरपला..
तब्बल सहा दशके हिंदी चित्रपटसृष्टीचा ‘प्राण’ म्हणून मिरवणाऱ्या या अभिनेत्याला २००१ मध्ये ‘पद्मभूषण’ किताब देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी फिल्मफे अर पुरस्कार, राज कपूर पुरस्कार असे कित्येक मानाचे पुरस्कार मिळवले होते. भारतीय चित्रपटसृष्टी शंभर वर्षांची वाटचाल पूर्ण करत असतानाच प्राण यांना दादासाहेब फाळके जीवनगौरवसारख्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवले जावे, हाही एक छान योगायोग होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-07-2013 at 10:34 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran actor pran krishan sikand passes away after prolonged illness